शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला यंदा विरोधकांची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:42 PM2021-12-24T12:42:35+5:302021-12-24T12:48:33+5:30
सिडको : नव्याने विकसित होत असलेल्या वसाहतींचा भाग म्हणून ओळखला जाणारा सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ या प्रभागात गेल्या अनेक ...
सिडको : नव्याने विकसित होत असलेल्या वसाहतींचा भाग म्हणून ओळखला जाणारा सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ या प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. यापुढील काळात सेनेला आपला बुरुज टिकविण्यासाठी मनसे, भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान असणार असून, अन्य पक्षांनी तशी तयारी सुरू केली आहे. या प्रभागात शिवसेनेकडून सर्वधिक इच्छुकांची संख्या असल्याने उमेदवारी देताना पदाधिकाऱ्यांना चांगलीच परीक्षा होणार असल्याचे दिसून येत आहे.
या प्रभागात प्रामुख्याने शुभम पार्क, बंदावणेनगर निखिल पार्क परिसर, उपेंद्रनगर, महाजननगर ,एकदंत नगर, वावरेनगर, महालक्ष्मीनगर, स्वामी नगर, डीजीपीनगर, वृंदावननगर, साळुंकेनगर या भागाचा सामान्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा भागावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. याआधी शिवसेनेकडून तानाजी फडोळ, उत्तम दोंदे, संध्या आहेर यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेच्या चारपैकी तीन नगरसेवक निवडून आले. यामध्ये विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले यांचा समावेश आहे. याच प्रभागातून भाजपच्या एकमेव महिला नगरसेवक प्रतिभा पवार ह्या निवडून आल्या आहेत. अर्थात, यातील सुवर्णा मटाले मनसेतून, तर प्रतिभा पवार पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेस पक्षाने ताकद लावली आहे.
याच प्रभागातून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे व श्रमिक सेनेचे जिल्हा अध्यक्ष अजय बागुल यांनी तयारी आरंभली असून, ती डी. जी. सूर्यवंशी यांच्या दृष्टीने काहीशी अडचणीची आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या पत्नी अरुणा दातीर यांनी अपक्ष उमेदवारी करीत चांगली मते मिळविली आहे .यामुळे यंदा दिलीप दातीर यांनी याच प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याज्ञिक शिंदे यांनी नुकताच मनसेत प्रवेश करून उमेदवारीवर दावा केला आहे. याच परिसरातील वंदना पाटील यांनीदेखील काँग्रेस पक्षाकडून तयारी केली आहे. प्रभाग रचनेनंतर बरीच राजकीय समीकरणे स्पष्ट हेाणार असली तरी सेनेला विरोधक टक्कर देतील अशीच चिन्हे आहेत.