‘कालिदास’च्या खासगीकरणास नाट्य परिषदेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:58 AM2018-06-21T00:58:30+5:302018-06-21T00:58:30+5:30
महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे.
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने पुढाकार घेतला असून त्यांनी कलामंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी योग्य ती दरवाढ करावी परंतु खासगीकरण करू नये, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी संचालकांना पत्र दिले आहे, शिवाय शासनालादेखील निवेदन सादर केले जाणार आहे.
महाकवी कालीदास कलामंदिर हे नाशिकचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. तथापि, महापालिकेने त्याची योग्य पध्दतीने देखभाल न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात मोहन जोशी, प्रशांत दामले यांच्यासह अनेक कलावंत आणि अन्य रंगकर्मींनी आवाज उठविला आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर दामले यांनी फेसबुक पेजवर कालीदासाची व्यथा मांडल्यानंतर महापालिकेतील सत्तारूढ मनसेचे नेते राज ठाकरे यांना हा विषय झोंबला होता. त्यानंतर त्यांनी कालीदासाचे संकल्पना चित्र देखील तयार करून प्रसिध्द केले होते. नाशिकची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर त्याला मुहूर्त लाभला असला तरी त्यावेळीदेखील कामाचा ठेका दिल्यानंतर कलावंतांची मते जाणून घेण्याची औपचारीकता पूर्ण करण्यात आल्याने त्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली होती, आता तर पालिकेने त्याचे खासगीकरणाचा घाट घातला असून स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे या कलावंतांनी त्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आता नाट्य परिषदेनेच पुढाकार घेऊन कालीदास कलामंदिराचे खासगीकरण करण्यास विरोध केला आहे.महाकवी कालिदास कलामंदिरचा झालेला कायापालट समाधानकारक असून, नाशिक शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीस चालना देणारा आहे. आता रसिकांना नाटकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रसन्न वातावरणात आस्वाद घेता येणार आहे. मात्र कालिदासचे खासगीकरण केले जाणार असल्याचे समजल्याने ते मारक ठरण्याची शक्यता असल्याने असा निर्णय घेऊ नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. कालिदास कलामंदिरचे पावित्र्य राखण्यासाठी सध्याच्या भाड्यात अल्पशी वाढ केली तर हरकत नाही, पण त्याचे खासकीकरण करू नये, ठेकेदाराच्या हातात देण्यापेक्षा त्याचे नियंत्रण महापालिकेकडेच ठेवावे, अशी विनंती पत्राद्वारे नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांच्याद्वारे करण्यात आली आहे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री, महापौर, खासदार, आमदार, आयुक्त, स्मार्ट सिटी प्रमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई, नाट्य निर्माता संघ यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. स्मार्ट सिटीचे संचालक शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांना गुरुवारी (दि.२१) परिषदेतर्फे पत्र सुपूर्द करण्यात येणार आहे.