लहान शहरांत गृहनिर्माणला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:21 AM2018-07-15T01:21:20+5:302018-07-15T01:21:45+5:30
नाशिक : सद्य:स्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यावसायिक बांधकाम असून, देशातील ९२ टक्के जनता महानगरांव्यतिरिक्त लहान शहरांमध्ये वास्तव्यास आहे. परंतु, अशा शहरांमध्ये आतापर्यंत केवळ ४० टक्केच बांधकाम झाले आहे. त्यामुळे लहान शहरांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणातसंधी उपलब्ध असल्याचा सूर महाकॉन २०१८ या राज्यस्तरीय परिषदेत उमटला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील धन्वंतरी सभागृहात शुक्रवारपासून सुरू असलेल्या महाकॉन परिषदेचा शनिवारी (दि.१४) समारोप झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सेटलमेंट आयुक्त व संचालक लॅन्ड रेकॉर्ड एस. चोक्कलिंगम, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, माजी चेअरमन इरफान रझाक, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा यांच्यासह बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा, बोमन इरानी, अनुज पुरी, मनोज गौर आदींनी मार्गदर्शन केले. देशात कृषी क्षेत्रानंतर बांधकाम उद्योग सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून, वाढता कर व घटलेला नफा ही या क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. परंतु, सध्याची स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असून, ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांनी महाकॉनच्या माध्यमातून व्यक्त केली.
बांधकाम क्षेत्रात ब्रँडचे महत्त्व सांगताना इरफान रझाक, सतीश मगर व सुहास मर्चंट यांनी अनेक उदाहरणांसह सदस्यांना मार्गदर्शन केले. दर्जा व विश्वास या सोबतच योग्य संवाद हे ब्रॅँड बनण्यामागचे गुपित असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले.