आरटीई प्रवेशासाठी ३ ते २१ मार्चदरम्यान अर्जांची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:50+5:302021-02-27T04:17:50+5:30
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली या शाळांमधील ४ हजार ५४४ ...
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली या शाळांमधील ४ हजार ५४४ जागांवर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशसाठी ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
आरटीईअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ व २०२२ या वर्षाकरिता आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. शाळांच्या नोंदणीनंतर आता आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ३ ते २१ मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
इन्फो-
राखीव जागांमध्ये घट
आरटीई प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना ३ ते २१ मार्च या कालावधीत आरटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ हजार ६६६ विद्या्र्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर ८९१ जागा रिक्त राहिल्या होत्या, तर २०२१-२२ शैक्षणिक वर्ष ४५० शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र मागील वर्षी प्रवेशप्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एकूण जागांच्या तुलनेत २५ टक्के राखीव जागांमध्येही घट झाली आहे.
इन्फो-
आवश्यक कागदपत्र
आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, त्यांच्या प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर निर्माण केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल. लॉटरीत नाव आल्यास ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी लागणार आहे.