सेट परीक्षेसाठी २५ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:54+5:302021-06-18T04:10:54+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वरिष्ठ महाविद्यालयांत २६ सप्टेंबरला सहायक प्राध्यापक पदाकरिता राज्य पात्रता परीक्षा (सेट) ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वरिष्ठ महाविद्यालयांत २६ सप्टेंबरला सहायक प्राध्यापक पदाकरिता राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेतली जाणार आहे. सेट परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मेपासून १० जूनपर्यंत मूद देण्यात आली होती. ही मुदत वाढवून १७ जूनपर्यंत करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी ही मुदत संपली असून आता परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना २५ जूनपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. अशा उमेदवारांना ५०० रुपयांचे विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.
सहायक प्राध्यापक पदाकरिता येत्या २६ सप्टेंबरला महाराष्ट्र व गोवा राज्यात सेट परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाने २०२१ मध्ये हाेणाऱ्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली असून त्यानुसार सेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून २५ जूनपर्यंत इच्छुक व पात्र उमेदवारांना विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच निर्धारित शुल्क ऑनलाइन स्वरूपातच भरायचे आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे. १६ सप्टेंबरला परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. वेळापत्रकानुसार २६ सप्टेंबरला ही परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाने केलेली आहे.