मानोरी, कणकोरी ग्रामपंचायतीत नवोदितांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 09:20 PM2021-01-20T21:20:08+5:302021-01-21T00:54:22+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत काही वॉर्डांमध्ये मातब्बरांना धूळ चारत युवकांनी बाजी मारली. मानोरीत ग्रामविकास तर कणकोरीत परिवर्तन पॅनलने बहुमत प्राप्त केले.
मानोरी ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डात ११ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. वॉर्ड क्रमांक दोन मध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत होत युवा शक्ती पॅनलच्या सुवर्णा ज्ञानेश्वर सांगळे (१४४) यांनी विजय मिळवला. वॉर्ड क्र. तीन मध्ये तीन जागांसाठी समोरासमोर लढत होत ग्रामविकास पॅनलने बाजी मारली. योगेश रामनाथ सानप (४००), तुकाराम भोमाजी सांगळे (४५३), उषा नामदेव सांगळे (४९०) यांनी विजय मिळवला. वॉर्ड क्र. चार मध्ये एका जागेसाठी लढत होत सोमनाथ हरिभाऊ जाधव (३८३) यांनी विजय मिळवला.
तर यापूर्वी वॉर्ड क्र. एकमधून मच्छिंद्र चांगदेव म्हस्के व पुष्पा योगेश कर्डेल, वॉर्ड क्र. दोनमधून भाऊसाहेब पंढरीनाथ नवले व श्रद्धा शांताराम कोरडे तर वॉर्ड क्र. चार मधून वंदना गणेश चकणे व मंगल सुरेश सांगळे यांची बिनविरोध निवड झाली होती.
कणकोरी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना पायउतार करीत मतदारांनी कणकेश्वर परिवर्तन ग्रामविकास पॅनलला संधी दिली. ९ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाल्याने आठ जागांसाठी परिवर्तन व ग्रामविकास पॅनलमध्ये समोरासमोर लढत झाली. वॉर्ड क्र. एक मध्ये तिन्ही जागा ग्रामविकास पॅनलने पटकाविल्या. वत्सला दादाहरी सांगळे (१६२), संतू मुरलीधर सानप (१३८), मनिषा सोमनाथ जगताप (१९३) हे विजयी झाले. वॉर्ड क्र. दोन मध्ये परिवर्तन पॅनलचे अण्णासाहेब कारभारी बुचकुल (२२७), योगिता रामनाथ सांगळे (२२८), ज्योती गणेश सांगळे (२१८) यांनी विजय मिळवला. तर वॉर्ड क्र. तीन मध्ये परिवर्तनचे सुरेश झुंबर थोरात (२४९) व शिवानी दिलीप माळवे (२४८) यांनी बाजी मारली. वसंत विधाते यांची बिनविरोध निवड झाली. निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.