मनसेच्या जागांवर ‘निसटावंतां’ना संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:33 AM2019-09-26T01:33:30+5:302019-09-26T01:35:16+5:30
निवडणूक लढविण्याबाबत असलेली द्विधास्थिती संपवून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आलेल्या मनसेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १५ जागी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८ ते १० जागीच स्वपक्षाचे सक्षम उमेदवार उभे करण्याची पक्षाची सध्याची स्थिती आहे.
नाशिक : निवडणूक लढविण्याबाबत असलेली द्विधास्थिती संपवून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आलेल्या मनसेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १५ जागी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८ ते १० जागीच स्वपक्षाचे सक्षम उमेदवार उभे करण्याची पक्षाची सध्याची स्थिती आहे. उर्वरित जागांवर प्रामुख्याने अन्य पक्षांकडून तिकीट न मिळालेले असंतुष्ट आणि अन्य पक्षांतून ऐन क्षणी दाखल झालेल्या ‘निसटावंत’ उमेदवारांनादेखील संधी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
मनसेने राज्यभरात १०० जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असताना त्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या सुवर्णचतुष्कोनावरच त्यांचा भर राहणार आहे. त्यात नाशिकने २००९ साली तीन आमदार निवडून देत अभूतपूर्व असे यश मिळवून दिले असल्याने मनसेने यंदा नाशिककडून पुन्हा अपेक्षा ठेवली आहे. अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत मनसेचे राजगड ओसंडून वाहात असल्याचे चित्र बघून राज्यस्तरावरून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा-देखील हुरूप वाढला होता. २०१४च्या निवडणुकीत हातातून नाशिकच्या तिन्ही जागा गमावल्याचे शल्य मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वासह मनसैनिकांच्या मनात कायम आहे. विशेषत्वे या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले. तसेच स्वत: राज ठाकरे यांच्याकडून मोदी आणि शहा यांच्यावरच प्रहार केले जात असल्याने मनसेकडून भाजपकडून झालेल्या पराभवाची परतफेड हेच मुख्य लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
ग्रामीणला शक्यता अधिक
महानगरात मनसेकडे तिन्ही जागांवर सक्षम उमेदवार असून, त्यांच्यातूनच अंतिम निवड केली जाणार आहे. मात्र, ग्रामीणच्या बारा जागांपैकी सर्व जागांवर मनसकडे सक्षम उमेदवार नाहीत, याची वरिष्ठ नेतृत्वालादेखील जाणीव आहे. त्यामुळेच मनसेकडून उमेदवारांची यादी तयार करताना अन्य पक्षियांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे दमदार असंतुष्ट गळाला लागतील, त्यांचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. अर्थात अशा निसटावंतपेक्षा जुन्या निष्ठावंतांनाच ग्रामीणमध्ये देखील उमेदवारी मिळावी, हीच त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मनसेच्या कार्यशैलीप्रमाणे साहेब ठरवतील तोच आपला उमेदवार असे मानून कार्यकर्त्यांना काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.