२६ जुलैपासून अर्जातील भाग एक भरण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:01 PM2020-07-22T22:01:37+5:302020-07-23T00:56:05+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रासह पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्रात आॅनलाइन केंद्रभूत पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ अर्थात महाविद्यालयाचे पर्याय (पसंतीक्रम) निवडीसाठी अर्जाचा भाग भरता येणार आहे. परंतु, त्यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, त्यासाठी बुधवारपर्यंत (दि.२२) मुदत देण्यात आली आहे. तर उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून आॅनलाइन प्रमाणित करण्याची प्रक्रिया २४ जुलैपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फ त राबविली जाणार आहे.
---------------
दहावीच्या निकालानंतर भाग दोन
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यात विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपाची माहिती भरण्यासह मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि शाळा मुख्याध्यापकांकडून अर्ज पडताळणी करून घ्यावा लागणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्यक भाग दोन भरता येणार आहे.