समाजाची परिवर्तनशीलता, धर्माची गतिमानता अवलोकनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:41 AM2019-07-08T00:41:45+5:302019-07-08T00:42:12+5:30
भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी उन्हा-पावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्षे वारीत चालत आहे. जणूकाही संपूर्ण महाराष्ट्रच पंढरीची वारी करत असतो. शेतकरी, कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करत आहे. कपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठल नाम हेच वारकरी समाजाचे द्योतक आहे.
भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी उन्हा-पावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्षे वारीत चालत आहे. जणूकाही संपूर्ण महाराष्ट्रच पंढरीची वारी करत असतो. शेतकरी, कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करत आहे. कपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठल नाम हेच वारकरी समाजाचे द्योतक आहे.
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू, आळंदी येथून पंढरपूरकडे निघते आणि लाखो वारकरी या पालखीसोबत चालतात. संतांची शिकवण हे महाराष्ट्राचे मूल्य आहे. या मातीत जन्मलेले राजे छत्रपती शिवराय ते शाहू महाराज यांनी संतांच्या शिकवणीचे पालन केले आहे. संत वैष्णव धर्माची मांडणी करतात, जी समानतेवर आधारित आहे. संतांना भेद पसंत नाही. गरीब- श्रीमंत, स्त्री-पुरुष, जातीची उच्च-निचता हे संतांना मान्य नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ जग हे एक पावन शक्तीने भरलेले आहे. इथे भेदाभेद करणे अमंगळ आहे, हेच वारीचे सूत्र आहे. संत ज्ञानेश्वरांनीही पसायदानात भगवंताकडे खळांचे खळपण नष्ट व्हावे, अशी उदात्त मागणी केली आहे. पंढरपूरची वारी म्हणजे लोकांनी लोकांना लावलेली शिस्त आहे. संतांची शिकवण अंगी उतरावी म्हणून केलेली तपश्चर्या आहे.
वारकरी संप्रदायाने दिंडी वारी, यात्रा अशा सामूहिक उपासनेवर प्रतिज्ञाबद्ध होऊन कटाक्षाने भर दिलेला आहे. त्यामागे व्यक्ती-समाज-धर्म यातील परस्पर संबंधाचा विपूल मानस शास्त्रीय आशय असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता दिसून येते. समाजाची परिवर्तनशीलता व धर्माची गतिमानता या विषयीचे साक्षेपी अवलोकन करण्याची दुर्मीळ संधी अशा सामूहिक दिंडी सोहळ्यातून व पंढरीच्या वारीतून मिळते. प्रपंचात व्यवस्था असते पण वारीमध्ये सुखानुभूतीची अवस्था प्राप्त होते म्हणून पंढरीची वारीची ओढ असते. वारीमध्ये प्रेम, त्याग, सेवा, विश्वबंधुत्व अशा थोर सद्गुणांची शिकवण व जोपासना घडविण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे, यामुळे दिवसेंदिवस वारीची अभिवृद्धी होताना दिसते, कारण वारी नुसती प्रथा नाही तर ती संत परंपरा आहे. वारीमध्ये सद्गुणाचे शिक्षण, शिकवण व संस्कार आपोआप होतात. ही भक्तीप्रेमाची ऊर्जा पुढील वारीपर्यंत टिकते. नामस्मरणाची गोडी वारीतच वाढते. ज्ञान, प्रेम, भक्तीने माणसं वारीतच जोडायची असतात, याकरिता प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी.
वारीचे तीन आठवडे माणूस चालतो, असा रस्ता जो त्याला समानतेकडे, भक्तीकडे, संवेदनशीलतेकडे आणि निसर्गाकडे घेऊन जातो. वारीच्या रस्त्यावर भाविक हा रस्त्यावर झोपतो, तो उन्हात चालतो, तो झाडाखाली बसतो, तो पावसात भिजतो, तो निसर्गातील प्रत्येक कणाशी एकरूप होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अणुरेणूहुनी तोकडा, तुका आकाशा ऐवढा...’ हा अनुभव घेण्यासाठी संतांची ही वारी परंपरा इथल्या मातीला वारकऱ्यांना समृद्ध करते. काळ्या मातीची आणि अथांग आकाशाची साक्ष ठेवत पावसाच्या सरींनी भक्तिरसाने चिंब करणारी ही वारी अवर्णनीय आहे. महाराष्ट्राची माती ही पुरोगामी आहे. इथे भेदाभेद भ्रम मानला जातो, हे देशाला दिसले आहे. म्हणूनच राज्याने देशाला समता-बंधुता शिकविली आहे. जगाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अथवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे जगात प्रचंड बदल झाले असले तरी वारीची ही परंपरा युगानुयुगे चालत राहणार आहे. कारण वारीचा पाया हा संतांच्या भक्कम साहित्यावर, त्यावरील मूल्यांवर आधारित आहे. भक्तिरसाने ओथंबलेल्या या वारीचा मोह अनेकांना सुटता सुटत नाही. शरीराने साथ दिली नाही तरी मन थांबत नाही. पृथ्वीच्या पाठीवर चालणारा हा सोहळा स्वर्गसुखाची अनुभूती देणारा आहे. या भक्तिसागरात न्हाऊन निघण्यासाठी वारी अनुभवलीच पाहिजे.
याठिकाणी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात.
(लेखक निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे माजी अध्यक्ष)