मतदार नोंदणीची १४ आॅक्टोबरपर्यंत संधी
By admin | Published: September 16, 2016 11:44 PM2016-09-16T23:44:05+5:302016-09-16T23:44:21+5:30
राजकीय पक्षांना आवाहन : निवडणुकीसाठी यादी ग्राह्य
नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची इच्छुकांनी एकीकडे तयारी चालविली असताना दुसरीकडे निवडणूक आयोगानेही या निवडणुकीतील मतदानापासून मतदार वंचित राहू नयेत यासाठी मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेऊन १४ आॅक्टोबरपर्यंत नवीन मतदार नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हीच यादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या संदर्भात आज निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांची माहिती देऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शुक्रवार दि. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या दरम्यान नवीन मतदारांची नोंदणी होऊ शकते त्याच बरोबर नाव, पत्त्यात बदल, लिंग बदल, मतदारसंघ, केंद्रात बदल यासारखे मतदार यादीतील बदलही मतदारांना करून घेण्याची संधी आहे. या मोहिमेसाठी १८ सप्टेंबर व ९ आॅक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदार याद्या पाहता येतील व नाव नोंदणी, मतदार यादीतील तत्सम बदल करू शकतील. त्यानंतर मतदारांच्या हरकती व दाव्यांची सुनावणी घेण्यात येऊन ५ जानेवारी २०१७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१७ रोजी जे वयाची अठरा वर्षे पूर्ण करू शकतील त्यांनाही सहभागी होता येणार असून, ते नव मतदार म्हणून नाव नोंदवू शकतील. या मोहिमेत अधिकाधिक मतदारांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत या मोहिमेची माहिती देण्यात आली. त्यावेळी अनेकांनी बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित करून घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी केली जावी, अशी मागणी केली. तसेच शाळांमध्ये नेमलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांना या मोहिमेविषयी काहीच माहिती नसते परिणामी मतदारांचा भ्रमनिरास होतो अशी तक्रार करण्यात आली. बीएलओंचे कार्य व अधिकार काय याचीही माहिती विचारण्यात आली. यावेळी भाजपाचे गिरीश पालवे, अरुण शेंदूर्णीकर, शिवसेनेचे रवींद्र जाधव, बसपाचे अरुण काळे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार गणेश राठोड उपस्थित होते.