नवोदयसाठी १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:38+5:302020-12-06T04:15:38+5:30
नाशिक : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी २२ इच्छुक विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. त्यासाठी २२ऑक्टोबरपासून नोंदणीप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार असून, १० एप्रिल २०२१ रोजी ही निवड चाचणी होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी जिल्ह्यातील शासकीय /निमशासकीय अनुदानित अथवा मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये शिक्षण घेत असावा. तसेच या विद्यार्थ्याने तिसरी, चौथीचे शिक्षणही सरकारी/निमसरकारी अनुदानित अथवा मान्यताप्राप्त शाळेत घेतलेले असणे अनिवार्य आहे. संबंधित विद्यार्थ्याचा जन्म १ मे २००८ ते ३० एप्रिल २०१२ दरम्यान झालेला असणे बंधनकारक आहे. नवोदय विद्यालयातील किमान ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असून, १/३ जागा मुलींकरिता राखीव आहेत. याशिवाय शासकीय नियमानुसार इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांगांसाठी जागा राखीव असणार आहेत.