नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नाशिक शाखेतून यंदा तिघांना मिळणार प्रतिनिधीत्व करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:57 PM2018-01-17T13:57:17+5:302018-01-17T13:58:47+5:30

नाट्य परिषद निवडणूक : उद्या अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस

 The opportunity to represent three teams from the Nashik branch of the Natya Parishad elections this year | नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नाशिक शाखेतून यंदा तिघांना मिळणार प्रतिनिधीत्व करण्याची संधी

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नाशिक शाखेतून यंदा तिघांना मिळणार प्रतिनिधीत्व करण्याची संधी

Next
ठळक मुद्देयापूर्वी, उत्तर महाराष्ट विभागातून चार सदस्य निवडून दिले जात होतेझोन तयार करताना नाशिकपासून जळगाव आणि नगर स्वतंत्र करण्यात आले आहे

नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची घटनादुरूस्तीनंतर प्रत्यक्ष मतपेटीद्वारे पंचवार्षिक निवडणूक होत असून नियामक मंडळाच्या सदस्यपदासाठी यंदा नाशिक शाखेतून तिघांना संधी मिळणार आहे. यापूर्वी, उत्तर महाराष्ट विभागातून चार सदस्य निवडून दिले जात होते. यावेळी मात्र, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला ७ जागा आल्या असून त्यातील तीन सदस्य नाशिक शाखेतून निवडून दिले जाणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून नाशिक शाखेतून बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू आहेत.
सन २०१३ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची निवडणूक बोगस मतपत्रिकांमुळे गाजली होती. त्यावेळी, नाशिकचेच विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. बोगस मतपत्रिकांबाबतचा वाद सध्या न्यायप्रवीष्ट आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत टपाली मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. त्यावेळी नाशिक झोनमध्ये अहमदनगर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश होऊन ४ जागांवर मतदान झाले होते. ४ जागांसाठी सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ.संजय दळवी, प्रशांत जुन्नरे, राजेंद्र जाधव, श्रीपाद जोशी, सतिश लोटके, सुरेश गायधनी आणि अपक्ष सुरेश राका हे नऊ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत नाशिकमधून सुनील ढगे आणि राजेंद्र जाधव, जळगावमधून श्रीपाद जोशी तर नगरमधून सतिश लोटके हे मध्यवर्ती शाखेवर निवडून गेले होते. मागील पंचवार्षिक काळात बोगस मतपत्रिकांवरून रणकंदन माजल्याने अखेर नाशिकचेच दीपक करंजीकर यांच्या पुढाकाराने मध्यवर्ती शाखेची घटना सुधारित करण्यात आली. दुरुस्त करण्यात आलेल्या घटनेनुसार, आता नियामक मंडळातील सदस्यसंख्या ४५ वरुन ६० वर जाऊन पोहोचली असून कार्यकारिणी मंडळाची सदस्य संख्या २१ असणार आहे. यावेळी, झोन तयार करताना नाशिकपासून जळगाव आणि नगर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा नाशिक शाखेतून दोन ऐवजी तीन तर जळगाव आणि नगरमधून एका सदस्याऐवजी प्रत्येकी दोन सदस्य परिषदेवर निवडून जाणार आहेत. नाशिक शाखेतून तिघांना संधी मिळणार आहे. नाशिक शाखेची सदस्यसंख्या १३०० आहे. त्यातील १०५० सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (दि.१८) अखेरचा दिवस असून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. गुरुवारी मुंबईत बैठक होत असून त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेला येणारा १० लाख रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे, गुरुवारी मुंबईत होणा-या बैठकीकडे लक्ष लागून असणार आहे.
ढगे,जाधव पुन्हा इच्छुक
मध्यवर्ती शाखेवर जाण्यासाठी नाशिक शाखेचे विद्यमान कार्यवाह सुनील ढगे आणि सदस्य राजेंद्र जाधव पुन्हा इच्छुक आहेत. तिस-या जागेसाठी विद्यमान अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम यांच्या नावाची चर्चा आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ‘नटराज’ पॅनलकडून आव्हान देणारे जयप्रकाश जातेगावकर मात्र यंदा रिंगणात उतरणार नाहीत. त्यांच्याऐवजी फे्रंडस् सर्कलची धुरा सांभाळणारे विशाल जातेगावकर निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक शाखेत निवडणुकीत चुरस बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  The opportunity to represent three teams from the Nashik branch of the Natya Parishad elections this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.