संस्कारांच्या शिंपणाची संधी!
By किरण अग्रवाल | Published: June 11, 2020 08:48 AM2020-06-11T08:48:56+5:302020-06-11T08:49:48+5:30
लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकून पडलेल्या आपल्या पाळीव श्वानांसाठी खास विमानाचे तिकीट काढणारे एकीकडे असताना, अननसात स्फोटक भरून हत्तिणीचा जीव घेणारे दुसरीकडे आढळतात ते म्हणूनच.
- किरण अग्रवाल
सुहृदयता अथवा संवेदनशीलता या तशा व्यक्तिसापेक्ष बाबी आहेत. प्रत्येकातच त्या आढळतील असे नाही. जाणिवांशी तुमचे नाते किती व कसे आहे, यावर ते अवलंबून असते. स्वत:च्याच कोशात रममाण राहणाऱ्या स्वमग्न व्यक्तीचे व इतरांचा विचार करणाऱ्यांचे वर्तन यात भिन्नता आढळते ती त्यामुळे. पीड पराई जाणणारा जो असतो, तो सकल मनुष्य-प्राण्यांप्रति सारख्या ममत्वाने वागताना दिसून येतो, तर ज्याला दुसऱ्याच्या पिडेशी घेणे-देणे अगर सुख-दु:ख नसते असा मनुष्य प्रसंगी पशुत्वाची पातळी गाठतानाही बघावयास मिळतो. लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकून पडलेल्या आपल्या पाळीव श्वानांसाठी खास विमानाचे तिकीट काढणारे एकीकडे असताना, अननसात स्फोटक भरून हत्तिणीचा जीव घेणारे दुसरीकडे आढळतात ते म्हणूनच. माणुसकीची व माणसातील हीनत्वाची चर्चा अशा प्रकरणांमुळे घडून येणे स्वाभाविक ठरते.
‘नरेचि केला हीन किती नर’ याची प्रचिती आणून देणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती नेहमीच घडत असतात. सध्याच्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन केल्या गेलेल्या काळातही अशा घटना कमी झालेल्या नाहीत. जिथे कौटुंबिक हिंसाचार वाढीस लागल्याची उदाहरणे आहेत तिथे प्राण्यांच्या छळाची काय कथा? केरळात गर्भवती हत्तिणीच्या मुखात स्फोटकाने भरलेला अननस कोंबून तिचा बळी घेतल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर व देशभरात याबद्दल संताप व्यक्त होत असताना तशाच निदर्यतेची आणखी काही प्रकरणे समोर आली. हिमाचलच्या विलासपूरमध्ये एका गायीलाही तशीच स्फोटके खायला दिली गेली तर दिल्ली येथे दुचाकीला बांधून एका श्वानाला रस्त्यावर फरफटत नेले गेल्याची घटना समोर आली. हे कमी म्हणून की काय, गुवाहाटी येथे एका मृत बिबट्या सोबत डान्स करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल झालेला बघावयास मिळाला. या प्रकरणात बिबट्याची हत्या करताना त्याचे दात व नखेही काढली गेल्याचे आढळून आले आहे. बिबट्याचे हे प्रकरण शिकारीशी संबंधित असावे, अन्य जंगली प्राण्यांची शिकार करतानाही असेच ‘फंडे’ वापरले जातात. या शिकारींचे व त्यातले अर्थकारण हा एक वेगळा विषय आहे; परंतु संवेदनेच्या दृष्टीने विचार करता या सर्व घटनांमधील निर्दयता हृदय पिळवटून काढणारी आहे.
महत्त्वाचे म्हणजे, प्राण्यांच्या क्रूरतेने छळाची उदाहरणे एकीकडे समोर येत असतानाच दुसरीकडे त्यांच्याबद्दल जिव्हाळा प्रदर्शित होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये दिल्लीत अडकून पडलेले पाळीव श्वान व पक्षी मुंबईत आणून सोडण्याकरिता एक सहा आसनी प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले आहे व संबंधितांनी लाखो रुपये खर्चून त्यात बुकिंगही केले आहे, तर बिहारमधील पटना जवळच्या दानापूर येथील अख्तर इमाम नामक एका व्यक्तीने आपली सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली आहे. या हत्तींनीच त्यांचा प्राण एकदा वाचवला होता म्हणे. घरोघरी श्वान व मांजरी पाळणाऱ्यांचा या प्राण्यांवर असलेला जीव एरव्हीही आपल्याला बघायला मिळतो. ग्रामीण भागातील शेती कामात महत्त्वाची भूमिका बजावणारा बैल मृत पावला तर त्या कुटुंबात व्यक्त होणारी हळहळ अनेकांनी अनुभवली आहे. पतंगाच्या मांजाने जायबंदी होणाऱ्या पक्ष्यांची सुश्रूषा करणारे पक्षिप्रेमी अनेक आहेत. प्राणिमित्रही कमी नाहीत. मुक्या प्राण्यांबद्दलची सुहृदयता तर त्यांच्याठायी आढळतेच, शिवाय त्यातून माणुसकी धर्माची जपणूकही घडून येते.
तात्पर्य, नाण्याला दोन बाजू असतात तसे हे आहे. प्राणी-पक्ष्यांचा छळ मांडून अघोरी आनंद घेऊ पाहणारे जसे आहेत, तसे त्यांच्यासाठी कळवळणारेही आहेत. व्यक्तिगणिक बदलणाऱ्या त्या त्या व्यक्तीच्या वृत्ती-प्रवृत्तीशी निगडित अशी ही कृती आहे. या वृत्तीचा संबंध संस्कारांशी असतो. रोजीरोटीसाठीच्या झगड्यात व जगण्याच्या रहाटगाडग्यात हे संस्काराचे वाण या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले जाणे म्हणूनच अत्यंतिक महत्त्वाचे आहे. पण हल्ली ते होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे. ‘कोरोना’ला रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘लॉकडॉऊन’च्या काळात सक्तीने घरी बसावे लागल्यानंतर किती कुटुंबात आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी आपल्या पाल्यांवर असे संस्काराचे शिंपण केले, नीती अगर बोधकथा मुला-बाळांना ऐकवल्या; त्यासाठी साने गुरुजींच्या गोड गोष्टींची पुस्तके घरी विकत आणली, असे प्रश्न केले गेले तर समाधानकारक उत्तरे मिळून न येण्याचीच खात्री आहे. अशी पुस्तके घेण्याऐवजी या काळात मोबाइल खरेदी वाढल्याचेच आकडे समोर आले आहेत. यातून मोबाइल गेमिंगमध्येच ही भावी पिढी गुरफटल्याचे स्पष्ट व्हावे. कोरोनानेच पुढे आणलेल्या ‘व्हर्चुअल’ सिस्टीम्समधून आकारास येऊ पाहणारे हे आभासीपण मनुष्याला कुठे घेऊन जाणार कुणास ठाऊक !