पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:22 AM2019-08-26T01:22:13+5:302019-08-26T01:22:32+5:30
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.
नाशिक : बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे. विशेष म्हणजे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियाही अजून सुरू असल्याने पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सततच्या शैक्षणिक धोरणामुळे यावर्षी प्रवेशप्रक्रियेला दिरंगाई झाली असून, ही दिरंगाई पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रवेशप्रक्रियेच्या प्रारंभीच्याच काळात आॅनलाइन प्रवेश प्रणालीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पारंपरिक विद्याशाखांसह व्यावसायिक शाखांतील पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.
यंदा सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला आहे. राज्यातील पूरस्थितीचा फटकाही प्रवेशप्रक्रियेला बसला असून, अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठासह विविध स्वायत्त महाविद्यालयांमधील शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.
शिक्षण मंडळाने नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळामार्फ त जुलै व आॅगस्ट २०१९ महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नाशिक विभागाचा सुमारे ३ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना लांबलेल्या प्रवेशप्रक्रियेचा फायदा होणार असून, विविध अभ्यासक्रमाच्या उर्वरित टप्प्यांमध्ये या विद्यार्थांना सहभागी होता येणार आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी व मार्च २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, मुख्य परीक्षेत यंदा निकालाची टक्केवारी घसरल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे आॅक्टोबरऐवजी १७ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत पुरवणी परीक्षा घेतली होती. यातून उत्तीर्ण झालेल्या ३ हजार ८९८ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकता येणार आहे. बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (डिप्लोमा) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने येथेही विद्यार्थ्यांना संधी असेल.