उत्तर महाराष्ट्राला पर्यटन विकासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:02+5:302021-01-08T04:42:02+5:30

नाशिक : राज्यात उत्तर महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चांगली संधी आहे. पर्यटन विकासाची यापूर्वी रखडलेली कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात ...

Opportunity for tourism development in North Maharashtra | उत्तर महाराष्ट्राला पर्यटन विकासाची संधी

उत्तर महाराष्ट्राला पर्यटन विकासाची संधी

Next

नाशिक : राज्यात उत्तर महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चांगली संधी आहे. पर्यटन विकासाची यापूर्वी रखडलेली कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाली असून, अजूनही विकासाला वाव आहे. इको टुरिझमसाठी सुक्ष्म नियोजनासोबतच शिर्डी, तोरणमाळ, सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन आराखडा तयार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या.

एमटीडीसीच्या ग्रेप सिटी रिसॉर्ट येथे उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यातील पर्यटनविषयक झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण आदी उपस्थित होते.

नाशिक बोट क्लब सुरू झाला, ही उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, बोटींबाबत विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. सारंगखेडा येथे नेलेल्या बोटी पुन्हा आणल्या आहेत. त्या आता नियमित कार्यान्वित ठेवण्याबरोबरच बोट क्लब वर सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, त्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नर्सरीसाठी जिल्ह्यात स्कोप आहे, नर्सरी चालकांची मदत घेऊन कामे करून पर्यटनस्थळ निसर्गरम्य वाटलं पाहिजे, जेणेकरून लोकांना तेथे आकर्षित करत येईल; वीज वाचविण्यासाठी सोलरची व्यवस्था करावी, एलईडीचा वापर वाढवावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या.

--इन्फो===

शतकोत्तर सुवर्णमहोत्सव होणार

नाशिक जिल्ह्यास १५० वर्षे पूर्ण होऊन जिल्ह्याने १५१व्या वर्षात पदार्पण केले आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्यासाठी एक वर्षभरापूर्वी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, कोरोनामुळे त्या कार्यक्रमांना थोडे बाजूला ठेवावे लागले आहे. येणाऱ्या काळात हे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही यावेळी पवार यांनी केल्या आहेत.

--इन्फो--

आरोग्य उपाययोजना प्राधान्यावर

कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, आरोग्य विभाग, प्रशासन यंत्रणेने कोटेकोरपणे कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेऊन लसीकरणासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत, त्या रुग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने, त्यांच्या उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.

Web Title: Opportunity for tourism development in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.