सिंहस्थासाठी पर्यायी शाहीमार्गाला विरोध
By admin | Published: January 19, 2015 12:21 AM2015-01-19T00:21:11+5:302015-01-19T00:24:53+5:30
ग्रामोत्सव समिती बैठक : वेळप्रसंगी आंदोलन छेडणार
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने यंदा गणेशवाडी ते गाडगे महाराज पटांगण असा पर्यायी मार्ग सुचविला असून, या पर्यायी शाहीमार्गाला सिंहस्थ ग्रामोत्सव समितीने विरोध दर्शविला आहे.
सिंहस्थ ग्रामोत्सव बैठक लक्ष्मणरेषा येथील शिवछत्रपती भवनात बाबूराव दौडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशासनाने पर्यायी शाहीमार्ग करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले नाही या शिवाय पर्यायी शाहीमार्गावरचा काही भाग अरुंद असून, शाही मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. पुरातन शाहीमार्गाला धार्मिक महत्त्व असून, पर्यायी शाहीमार्गाऐवजी जुनाच शाहीमार्ग ठेवावा याबाबत समितीतर्फे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचे बैठकीत ठरले. पर्यायी शाहीमार्ग बदलण्याबाबत प्रशासनाने वेळीच तोडगा न काढल्यास सिंहस्थ ग्रामोत्सव समितीतर्फे वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल व सिंहस्थ कुंभमेळ्यात काही परिणाम झाल्यास त्याला आखाडा परिषद तसेच प्रशासन जबाबदार राहील असा सूर बैठकीत निघाला. यावेळी सिंहस्थासाठी समितीचे अधिकृत कार्यालय व जनकेंद्र सुरू करणे समितीतर्फे स्वागत व अन्नदान छत्र उभारणे, वैद्यकीय व इतर समित्यांची स्थापना करणे, समितीची पुस्तिका व वेबसाईट तयार करणे, कॉल सेंटर सुरू करणे, समितीची पुस्तिका व वेबसाईट तयार करणे, कॉल सेंटर सुरू करणे आदि विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीचे कार्याध्यक्ष भगवान भोगे, पद्माकर पाटील, आर. आर. पाटील, अनिल वाघ, लक्ष्मण धोत्रे, मंगला ताजणे, हरिभाऊ लासुरे, कांतिलाल जयस्वाल, नथू देवरे किशोरभाई पटेल, गं. पा. माने, रिमा काकडे, देवकिसन पारिख, रघुनंदन मुठे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)