मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनास विरोध
By admin | Published: May 30, 2017 12:49 AM2017-05-30T00:49:34+5:302017-05-30T00:49:44+5:30
भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला असता, विरोधकांनी अभिनंदनाचा नव्हे तर त्यांच्या स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत रविवारी (दि.२८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून महापालिकेचा अपेक्षाभंग झाल्याने सोमवारी (दि.२९) अंदाजपत्रकीय सभेत विरोधकांनी भाजपाला खिजवण्याची संधी सोडली नाही. भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला असता, विरोधकांनी महापालिकेला काहीच मिळाले नसल्याने अभिनंदनाचा नव्हे तर त्यांच्या स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेसाठी भरघोस निधी देण्याचे मान्य केले असल्याचे महापौरांना वारंवार सभागृहाला सांगावे लागत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला.
अंदाजपत्रकीय महासभेत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेला भरघोस निधी देण्याचे मान्य केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला. महापौरांकडून अभिनंदनाचा ठराव आणल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले मात्र, विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला.
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांकडून काहीही ठोस मिळाले नसल्याचे सांगत स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली, तर राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनीही मुख्यमंत्र्यांनी नेमके काय दिले हे सभागृहाला सांगण्याची विनंती केली व ठरावास पक्षाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगत सभेचे कामकाज सुरू केले. परंतु, नंतर विरोधी सदस्यांकडून मुख्यमंत्री भेटीचा उल्लेख भाषणात येत गेला आणि भाजपाला खिजवण्याची संधी साधण्यात आली. माजी उपमहापौर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे
स्वागत केले परंतु, या बैठकीसाठी प्रत्येक नगरसेवकाला सन्मानाने निमंत्रित करण्याची गरज होती, असे सांगितले.
शेवटी महापौर रंजना भानसी यांनी बैठकीचा वृत्तांत थोडक्यात कथन करत मुख्यमंत्र्यांनी काही पॅकेज जाहीर करण्याऐवजी शहराच्या गरजा ओळखून प्रस्ताव सादर करण्याचे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले.