विरोधक एकत्र : निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजी मनपाच्या करवाढीने सत्ताधारी भाजपात अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:10 AM2018-04-15T01:10:33+5:302018-04-15T01:10:33+5:30
नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या रोषात आणखीच भर पडली.
नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या रोषात आणखीच भर पडली असून, वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवकांमध्ये अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. भाजपाने कर वाढीच्या प्रश्नावर विशेष महासभा बोलाविली असली तरी, विरोधी पक्षांकडून भाजपालाच टार्गेट केले जाणार असल्याने त्यातून कसा मार्ग काढायचा याचा खल सुरू झाला आहे. नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या हातात सत्ता दिल्यास नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. नाशिककरांनी फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवित भारतीय जनता पक्षाला नाशिक महापालिकेत स्पष्ट बहुमत देऊन सत्ता ताब्यात दिली. परंतु वर्षे उलटूनही महापालिका प्रशासन वा सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांना दिलासा देणारा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांचा कपाटाचा प्रश्न अद्यापही कायम असून, तो न सुटल्याने नवीन बांधकामे सुरू करण्यास व्यावसायिक धजावत नाहीत, त्याचा परिणाम बेरोजगार वाढीत तसेच शहराच्या विकास कुंठीत होण्यात झाला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केल्यामुळे तर त्यांच्या शिस्तपर्वाचा फटका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांइतकाच नाशिककरांनाही बसू लागला असून, त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीचा विचार करता सत्ताधारी भाजपा पूर्णत: दुर्बळ ठरली आहे. परिणामी मुंढे यांनी अलीकडेच केलेल्या करवाढीमुळे तर संपूर्ण नाशिककरांची नाराजीच भाजपावर ओढवली आहे. या करवाढीचे समर्थन करणे नगरसेवकांनाही अवघड झाले असून, अशातच विरोधी पक्षांनी या मुद्द्याचा आधार घेत भाजपाला करवाढीच्या प्रश्नावरून नाशिककरांमध्ये महापालिकेच्या कारभाºयांविषयी संताप व नाराजी व्यक्त केली जात असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही लोकप्रतिनिधी व प्रदेश पदाधिकाºयांमध्ये महापालिका आयुक्तांच्या निर्णयाबाबत मतभेद उघड झाले आहेत. काही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या विरोधात थेट शेतकरी मेळाव्यात सहभागी होऊन जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले आहे, तर काही लोकप्रतिनिधी व प्रदेशच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांची भूमिका योग्य ठरविली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून केल्या जाणाºया प्रचाराला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न विचारला जात आहे.