ठेकेदाराला मुदतवाढ देण्यास विरोध
By Admin | Published: February 2, 2015 12:52 AM2015-02-02T00:52:09+5:302015-02-02T00:52:36+5:30
ठेकेदाराला मुदतवाढ देण्यास विरोध
नाशिक : पेस्ट कंट्रोलसंबंधी सध्याच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यास विरोध करणारे आणि महापालिकेनेच ठेका चालवावा याची मागणी करणारे ९४ नगरसेवकांचे पत्र विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर केले खरे, परंतु आपण असे पत्रच दिले नसून आयुक्तांकडे सादर केलेल्या पत्रावर आपली बोगस स्वाक्षरी असल्याचा दावा शिवसेनेचेच नगरसेवक विनायक पांडे यांनी करत विरोधी पक्षनेत्याला घरचा अहेर दिला आहे.पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव गाजत असून, मागील महासभेत त्यावर चर्चा होऊन महापालिकेनेच संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊन कामकाज पुढे चालवावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी पुढाकार घेत सत्ताधारी मनसेच्या २८ नगरसेवकांसह एकूण ९४ नगरसेवकांचे विरोध दर्शविणारे पत्र आयुक्तांना सादर केले होते. या पत्राबाबत आता वाद निर्माण झाला असून, सेनेचेच नगरसेवक व माजी महापौर विनायक पांडे यांनी या पत्रावर आपली स्वाक्षरीच नसल्याचा दावा केला आहे. सदर प्रकरणाशी आपला काही संबंधही नसल्याचे पांडे यांनी स्पष्ट करत सेनेतील विसंवादाचे दर्शन घडविले आहे. (प्रतिनिधी)