विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:36+5:302021-05-03T04:09:36+5:30
नाशिक शहरात कोरोनाचा कहर असून, त्यातच रूग्णालयांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा पुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...
नाशिक शहरात कोरोनाचा कहर असून, त्यातच रूग्णालयांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा पुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ३०) नाशिक रोड येथील महापालिकेच्या नवीन बिटको रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. त्यानंतर तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत महापालिकेला काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या इतकेच नव्हे तर नाशिकसाठी दाेन खासगी कंपन्यांचे गॅस टँकर मिळवण्यासाठी खासगी उद्योगांशी चर्चा करून टँकरदेखील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. मात्र, बिटको रूग्णालयात ते पाहणी करत असताना, काहींनी त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपचे नाशिक रोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाचजणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.