‘त्या’ क्रूर अमानवी अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:08 PM2020-01-13T17:08:05+5:302020-01-13T17:12:00+5:30
बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेतली. बाहेरील कोणत्याही व्यक्तींना पिडितांना भेटू देऊ नये, तरूणांना स्पेशल रूम उपलब्ध करून देत पोलिस संरक्षणाची मागणीचे पत्र संबंधित पोलीस ठाण्याला द्यावे, अशा मागण्या यावेळी केल्या.
नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाऊसमध्ये गुरूवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत चक्क हवेत गोळीबार करत वाढदिवसाच्या नावाखाली ओली पार्टी करत धिंगाणा घातला होता. यावेळी डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरूणांना विवस्त्र करून अमानुषपणे या टोळक्याने मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारदेखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. या अमानवी अशा घृणास्पद राक्षसी कृत्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले. शनिवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पंचवटीमधील सराईत गुन्हेगार संदेश काजळे व त्याच्या गुंड साथीदारांनी फार्महाऊसमध्ये पहाटेपर्यंत हैदोस घातला. दोघा युवकांसोबत कुरापत काढून पिस्तुलमधून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करून विवस्त्र होण्यास भाग पाडले. उघड्या शरिरावर गुंडांनी कमरेच्या पट्टयासह मिळेल त्या वस्तूने अमानूषपणे बेदम मारहाण केली. अनैसर्गिक अत्याचारदेखील केल्याचे पिडितांनी सांगितलेल्या आपबितीमधून समोर आले आहे. पिडीत तरूणांना न्याय मिळावा आणि राजकिय वरदहस्त प्राप्त करून देत गुंडांना पाठीशी घालणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी येत्या शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय शासकिय विश्रामगृहावर सोमवारी (दि.१३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला व्यासपिठावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती, शरद आहेर, हेमलता पाटील, कविता कर्डक, राजेंद्र बागुल, किरण मोहिते, दिपक डोके, सुरेश दलोड, संतोष सोनपसारे, तानाजी जायभावे यांच्यासह पिडित युवकांचे कुटुंबियदेखील उपस्थित होते. मंगळवारी (दि.१४) सकाळी पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी संशयित आरोपींना पाठीशी घालत राजकिय वरदहस्त देणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून संशयित सहआरोपी म्हणून अटक करावी, अशी मागणी करण्यात येईल असे स्पष्ट केले.