वडाळा भागातील दारू दुकानाला विरोध
By Admin | Published: July 14, 2017 11:56 PM2017-07-14T23:56:02+5:302017-07-15T00:14:04+5:30
नाशिक : वडाळा भागातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या तळमजल्यावर अलीकडेच ‘महाराणी वाइन शॉप’ सुरू करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वडाळा भागातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या तळमजल्यावर अलीकडेच ‘महाराणी वाइन शॉप’ सुरू करण्यात आले असून, या दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांसह साधू-महंतांनी केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी सदरचे दुकान सुरू करण्यात आले असून, या संदर्भात रहिवाशांनी उपनगर पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने महादेव पार्क इमारतीतील रहिवाशांनी त्र्यंबकेश्वरचे बिंदू महाराज यांच्याकडे तक्रार केली. त्यावर शुक्रवारी बिंदू महाराज, स्वामी सागरानंद आदी महंतांनी स्थानिक नागरिकांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुकानामुळे परिसरातील महिला, तरुणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या दुकानाजवळच दोन मंदिरे असून, महिलांचे सभागृह तसेच हॉस्पिटलदेखील आहे. या दुकानाला परवानगी देताना धार्मिक स्थळे, आरोग्य केंद्रांचा विचार करण्यात आलेला नाही. दुकान सुरू करण्यासाठी सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या भावनांचा विचार करता सदरचे दुकान तत्काळ बंद करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महंत दीपानंदजी सरस्वती, मेघा थूल, सुशीला जाधव, शीतल अढांगळे, मटिल्डा डिसूजा, वैशाली दारोळे, सरिता चौरे, राजकन्या पटेल आदी नागरिक उपस्थित होते.
नवीन दुकाने रडारवर
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर दुकानदारांनी शहरी भागाकडे आपला मोर्चा वळविला असला तरी, शहराच्या मध्यवस्तीत वाइन शॉप सुरू करण्यास स्थानिक नागरिक विरोध करू लागले आहेत. तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हेन्यू इमारतीतील रहिवाशांप्रमाणे पेठरोडला मोती मार्केटच्या नागरिकांनीही विरोध दर्शविला. त्यापूर्वीही सिडको, सातपूर व पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड भागातील नागरिकांनी आंदोलने करून दुकाने बंद केली आहेत. आता त्यात महादेव पार्कची भर पडली आहे.