महात्मा फुले स्मारकाला सत्ताधाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:02 AM2019-03-07T01:02:32+5:302019-03-07T01:02:46+5:30
मालेगाव : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारक उभारणीला महापालिकेतील सत्ताधारी व मित्रपक्षांचा विरोध आहे. या प्रकरणी न्यायालयात ...
मालेगाव : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारक उभारणीला महापालिकेतील सत्ताधारी व मित्रपक्षांचा विरोध आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे महात्मा जोतिबा फुले स्मारक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील मोसम पुलावरील मराठी शाळेच्या जमिनीवर महापुरुषांचे स्मारक उभारावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय विचार मंच व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मारक कृती समिती महापालिकेकडे जागा मागत आहे; मात्र महापालिकेचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत आहेत. समितीची दिशाभूल केली जात आहे. महापालिकेच्या या धोरणाच्या निषेधार्थ समितीचे पदाधिकारी काळ्या फिती लावत आहेत. महासभेने प्रामाणिकपणे हा विषय मंजूर केला पाहिजे होता. महापालिकेतील सत्ताधारी व मित्रपक्ष स्मारक उभारणीला विरोध करीत आहेत. सरळ मार्गाने स्मारकासाठी जागा मिळाली नाही तर याप्रश्नी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली जाईल. विरोध करणाऱ्यांविरुद्ध दावे दाखल करणार असल्याचे समितीचे गुलाब पगारे, श्रीराम सोनवणे, संजय वाघ, प्रकाश वाघ, देवा माळी, भरत पाटील आदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.