मुंढेंच्या निर्णयाला भाजपातून विरोधाची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:38 AM2018-02-17T01:38:31+5:302018-02-17T01:38:46+5:30
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली आहे. भाजपाच्या एका नगरसेविकेने आयुक्तांना पत्र देत सदर वाहनतळ पूर्ववत सर्व पदाधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली आहे. भाजपाच्या एका नगरसेविकेने आयुक्तांना पत्र देत सदर वाहनतळ पूर्ववत सर्व पदाधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपातूनच मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोधाची सलामी मिळाल्याने आगामी संघर्षाची ही नांदीच मानली जात आहे. महापालिकेच्या राजीव गांधी भवनमधील आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळाच्या जागेत आजवर महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विषय समित्यांचे सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्यासह नगरसेवकांचीही वाहने पार्क केली जात होती. याशिवाय, काही दुचाकीही लावल्या जात होत्या. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसºयाच दिवशी सदर वाहनतळावर केवळ महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांचेच वाहन पार्क होईल, असे आदेश सुरक्षा विभागाला दिले. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून सदर वाहनतळावर पदाधिकाºयांच्या वाहनांना ‘नो एण्ट्री’ केल्याने वाहनतळाची जागा मोकळी झाली आहे. त्याचे स्वागतही अभ्यागतांनी केले. वाहनतळावर पदाधिकाºयांसह नगरसेवक वाहने लावून देत असल्याने प्रवेशद्वारावर मार्ग काढणे अवघड बनत असे. मुंढे यांनी केवळ तीनच वाहनांसाठी पार्किंगचे आदेश दिल्याने पदाधिकाºयांसह नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. गुरुवारी (दि. १५) नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील हे महापालिकेत आढावा बैठकीसाठी आले असता त्यांच्यासमवेत आलेल्या पदाधिकारी व आमदारांना पाठीमागील बाजूला वाहन पार्क करावे लागले. त्यामुळेही नाराजी प्रकट
झाली. दरम्यान, आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला विरोधाची पहिली सलामी सत्ताधारी भाजपानेच दिली असून, सदर वाहनतळ पदाधिकाºयांच्या वाहनांसाठी पूर्ववत करण्याची मागणी भाजपाच्याच नगरसेवक वर्षा भालेराव यांनी आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय, नगरसेवकांसाठी स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्याची सूचना करतानाच अभ्यागतांसाठीही मोकळ्या जागेत वाहनतळ उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भालेरावांच्या खांद्यावर बंदूक
महापालिका मुख्यालयातील वाहनतळाची जागा पदाधिकाºयांच्या वाहनांसाठी पूर्ववत उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या वर्षा भालेराव यांनी केली आहे. मात्र, भालेराव यांचा बोलविता धनी वेगळाच असून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आयुक्तांवर निशाणा साधण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. वाहनबंदीच्या या निर्णयामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात ही पहिली ठिणगी असल्याचे बोलले जात आहे.