पायी वारीसाठी फूस लावणाऱ्यांकडून वारकऱ्यांच्या जिवाशी खेळ : संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 04:57 PM2021-06-13T16:57:53+5:302021-06-13T17:00:31+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मनावर दगड ठेवून पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असून वारीमधून कोरोनाचा प्रसार झाला तर अशा संघटना व राजकीय पक्ष जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पायी वारीच्या मुद्द्यावर विरोधकांना टोला लगावला आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मनावर दगड ठेवून पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असून वारीमधून कोरोनाचा प्रसार झाला तर अशा संघटना व राजकीय पक्ष जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पायी वारीच्या मुद्द्यावर विरोधकांना टोला लगावला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका व ग्रामीण भागात चार दिवस दौरा केल्यानंतर संजय राऊत यांनी रविवारी (दि.१३) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका प्रभागरचना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांतील स्थानिक नेत्यांची एक, दोन दिवसांत चर्चा होईल. त्यानंतर लवकरच निर्णय होण्याचे संकेत दिले. तर राज्यात संपूर्ण पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले असून आपण त्याचे साक्षीदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. त्याचप्रमाणे २०२४ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाकितावर भाजपकडे मोदींशिवाय दुसरा चेहराच नसल्याची टीका केली; परंतु राजकारणातील बदल अतिशय वेगाने होतात. त्यामुळे भविष्यातील आडाखे आताच मांडता येणार नाहीत, असेही ते म्हणाले. सध्याच्या स्थितीत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपचा नव्हे तर केवळ मोदी, शहा यांचाच पराभव झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आतापासून विरोधकांनी मोर्चेबांधणी करून सक्षम चेहरा उभा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर मराठा समाजाच्या नेत्यांनी दिल्लीत मोर्चा काढणे आवश्यक असून आरक्षणाचा निर्णय संसदेत किंवा पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींकडेच होऊ शकतो. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे यांच्यासह वसंत गिते, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सुनील बागूल आदी उपस्थित होते.
भुजबळांना शिवसेचा नवा प्रवाह माहीत नाही
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाणार असून मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मंजुरी देऊन केंद्राला प्रस्ताव पाठविला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असून त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची बोचरी टीका करताना त्यांनी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.