विरोधकांकडून मविप्र निवडणुकीचे रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:33+5:302021-09-09T04:19:33+5:30
नाशिक : जिल्ह्यातील अग्रणी शिक्षणसंस्था मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विरोधी गटाने संस्थेचे माजी सभापती ॲड. ...
नाशिक : जिल्ह्यातील अग्रणी शिक्षणसंस्था मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विरोधी गटाने संस्थेचे माजी सभापती ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात विरोधकांनी विद्यमान सत्ताधारी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह कार्यकारिणीवर भ्रष्टाचार व मनमानी कारभाराचे आरोप करीत मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात बुधवारी (दि.८) निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मविप्र समाजाचे संस्थांतर्गत राजकारण रस्त्यावर आले असून, या निदर्शनांच्या माध्यमातून ॲड. नितीन ठाकरे यांच्या गटाने संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि सभासदांमध्ये वातावरण निर्मितीसाठी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत निवडणुकांचे रनशिंग फुंकले आहे.
मविप्र संस्थेच्या सभासदांच्या प्रश्नांना बगल देऊन सरचिटणीस केवळ अहवालातील माहितीचे सादरीकरण करण्यातच एक ते दीड तासाचा वेळ घेतात व त्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये सभा गुंडाळली जात असल्याचा आरोप ॲड. नितीन ठाकरे यांनी केला आहे. मविप्रच्या १०७ व्या सभेच्या निमित्ताने विरोधी गटाने ॲड. ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित येत कार्यकारी मंडळाविषयी असलेल्या तक्रारींचे पत्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना दिले. या पत्राच्या माध्यमातून त्यांना संस्थेच्या ठेवींवर कर्ज काढण्यात आले असून, त्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला नाही, सभासदांनी खर्चाचा ऑडिट रिपोर्ट मागूनही मिळत नाही. अशाप्रकारच्या मनमानी कारभारामुळे संस्थेवर कर्जाचा डोंगर निर्माण झाल्याचे नमूद करतानाच वारसा हक्काने होणारे नवीन सभासद व त्यांची माहिती अर्ज करूनही उपलब्ध करून दिली जात नाही. सभासदांना संस्थेच्या रुग्णालयाकडून कोणते औषधोपचार केले याविषीयी माहिती दिली जात नसून महाविद्यालयातर्फे चोरट्या मार्गाने रेमडेसिविरसारख्या औषधांची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोपही डॉ. नितीन ठाकरे यांच्यासह माजी सेवक सदस्य प्रा. अशोक पिंगळे यांच्यासह डी. बी. मोगल, मोहन पिंगळे, सुरेश डोखळे, प्रवीण जाधव, बाळासाहेब पावशे, के. डी. राजोळे, हिरामण सोणवणे, दौलत पिंगळे आदी सभासदांनी केले. दरम्यान, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रश्नोत्तराच्या काळात विरोधकांच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेसमोर उत्तरे देताना सर्व आरोप खोडून काढत संगणकीय सादरीकरणाद्वारे सभासदांना संस्थेच्या कार्यपद्धती व व्यवहारांची माहिती दिली.
इन्फो-
ऑनलाइन सभेची लिंकच मिळाली नाही. संस्थेच्या सभासदांनी सोशल मीडियावर प्रश्न मांडले तर त्यांच्यावर सायबर काद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याचप्रमाणे काही सभासदांना त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची धमकी दिली जाते. संस्थाचालक आता स्वत:लाच संस्था समजायला लागले आहेत. सेवकांना दहशतीच्या वातावरणात काम करावे लागत आहे. त्यांच्याकडूनच निवडणुकांचे काम करून घेतले जाते. मतपत्रिकाही संस्थेतच छापून निवडणुकांमध्ये गैरमार्गाचा अवलंब होत होता. उमेदवारांवर दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडले जाते. संस्थाबाह्य सत्ताकेंद्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी अथवा धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून या निवडणुका घेण्याची गरज आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, माजी सभापती, मविप्र
080921\08nsk_34_08092021_13.jpg
मविप्र संस्थेत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत आंदोनलन करताना माजी सभापती ॲड. नितीन ठाकरे, समवेत प्रा.अशोक पिंगळे यांच्यासह डी. बी, मोगल, मोहन पिंगळे, सुरेश डोखळे, प्रविण जाधव, बाळासाहेब पावशे, के. डी. राजोळे, हिरामण सोणवणे, दौलत पिंगळे, आदी.