जाचक अटी, कारवाईचा आयएमएतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:48 AM2020-09-12T01:48:14+5:302020-09-12T01:48:46+5:30
कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणा करण्यात देण्यात आला.
नाशिक : कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणा करण्यात देण्यात आला.
गेल्या सहा महिन्यांपासून खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोना संकटात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. अनेक व्यावसायिक आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, काहींचा तर त्यात मृत्यू झाला आहे. अशावेळी शासकीय आणि खासगी डॉक्टरांना पन्नास लाख रुपयांचा विमा काढण्याच्या घोषणेला तीन महिने झाले तरी अद्याप एकालाही लाभ देण्यात आलेला नाही. सरकार यासंदर्भात भेदभाव करीत आहेत. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आता सरकारी आरोग्य यंत्रणांचे अपयश झाकण्यासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. कोणताही शास्त्रीय आधार न घेता खासगी रुग्णालयांवर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत, सदरचे नियम अटी हटविण्यासाठी आयएमएच्या वतीने प्रयत्न केले जात असताना त्याची दखल तर नाहीच; परंतु ३१ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात सरकारी अटी अधिक जाचक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारचे जाचक नियम, कारवाई आणि बदनामीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
आयएमए य्रुग्णालयाच्या प्रांगणात व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी आयएमचे अध्यक्ष समीर चंद्रात्रे, डॉ सतीश पाटील, डॉ. सुदर्शन आहिरे, डॉ. कांचन लेले, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ, निनाद चोपडे, डॉ. सुदर्शन पंडीत, डॉ. प्रशांत देवरे, अनिरूध्द भांडारकर, डॉ. मालू, डॉ शोधन गोंदकर यांच्यासह अन्य संघटना सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.
आयएमएकडून सर्व शाखांना दिवस भर आंदोलन करण्याचे निर्देश असले तरी नाशिक शहरामधील रूग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी केवळ दुपारी शालीमार चौकात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी तोंडाला मास्क लावुन आरोग्य नियमांचे पालन देखील केले.