नाशिकला बेमोसमी पावसाचा रविवारी ‘ऑरेंज अलर्ट‘; गडगडाटी पावसासह गारपिटीचा इशारा

By अझहर शेख | Published: November 25, 2023 04:59 PM2023-11-25T16:59:57+5:302023-11-25T17:00:59+5:30

नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

orange alert for unseasonal rain in nashik on sunday | नाशिकला बेमोसमी पावसाचा रविवारी ‘ऑरेंज अलर्ट‘; गडगडाटी पावसासह गारपिटीचा इशारा

नाशिकला बेमोसमी पावसाचा रविवारी ‘ऑरेंज अलर्ट‘; गडगडाटी पावसासह गारपिटीचा इशारा

अझहर शेख, नाशिक : वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला जोरदार बेमोसमी वादळी गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी रविवारी (दि.२५) कुलाबा वेधशाळेकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात अवकाळी वादळी गडगडाटी पाऊस विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रापासून तर मालदीव अन् उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बेमोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात होऊ शकतो. तसेच वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट व गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवार व शनिवारी (दि.२५) नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. रविवारी ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो. सोसाट्याचा वारा किमान ४० ते ५० ताशी वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वातावरणात बदल झाल्यास हा अलर्टदेखील बदलू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान विभागाने नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये, विजा कोसळून हानी होण्याची शक्यता असते, यामुळे पशुधनदेखील सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतही बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी ढगाळ हवामान

शहरात शनिवारी सकाळपासून ढगाळ हवामान पहावयास मिळाले. नाशिककरांना सूर्यदर्शन उशिराने घडले. दहा वाजेच्या सुमारास कोवळी सूर्यकिरणे पडल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारीही उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती; मात्र वातावरणात दमटपणा तयार झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा जाणवला.

Web Title: orange alert for unseasonal rain in nashik on sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस