आदेशाला तलाठ्याकडून केराची टोपली
By admin | Published: November 18, 2016 10:22 PM2016-11-18T22:22:29+5:302016-11-18T22:21:27+5:30
इगतपुरी : तलाठ्याविरोधात तक्र ारींची दखल घेण्याची मागणी
इगतपुरी : आदिवासी व्यक्तीच्या जमिनीवरील पिकपाहणी प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला येथील तलाठ्याने कचराकुंडी दाखवून मनमानी करत असल्याची घटना समोर आली आाहे.
विशेष म्हणजे एक वर्षभरापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अजूनही तलाठी टाळाटाळ करत असून, या कामासाठी आर्थिक मागणी करीत असल्याचा आरोप पीडित आदिवासीने केला आहे. तालुक्यातील तलाठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील टिटोली येथील (गट क्र मांक २०४) भानुदास श्रावण चिमटे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. २०१३ मध्ये त्या जमिनीत गावातीलच एका व्यक्तीने पिकपाहणी दावा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेला होता. त्या दाव्याबाबत सुनावण्या होऊन निवासी नायब तहसीलदारांनी त्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला. म्हणून भानुदास चिमटे या आदिवासी व्यक्तीने निकालाविरोधात इगतपुरी-त्र्यंबकच्या प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. प्रांताधिकाऱ्यांनी आवश्यक चौकशी, साक्षी पुरावे, जाबजबाब, महसुली पुरावे, न्यायालयीन निर्णय यांचा अभ्यास करून निवासी नायब तहसीलदारांनी दिलेला आदेश रद्दबातल ठरवीत आदिवासी व्यक्ती भानुदास चिमटे यांचे नाव पिकपाहणी सदरी खुद्द म्हणून लावण्यासाठी आदेश दिला. गेल्या वर्षी या प्रकरणी आदेश होऊन टिटोलीचे तलाठी एस. के. धात्रक यांना आदेशावर अंमल करण्यासाठी कळवण्यात आले. भानुदास चिमटे यांनी स्वत:ही तलाठ्यास आदेशाची प्रत दिली. तथापि, गेल्या वर्षभरापासून तलाठी धात्रक यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सातबारा उताऱ्यावर केलेली नाही. उलट आधीच्या व्यक्तीचे नाव अजूनही तसेच आहे. चिमटे हे मुंबईहून वारंवार या कामासाठी तलाठ्यास भेटतात. परंतु तलाठी धात्रक त्यांना सांगतात की हे काम फार मोठे असून त्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल. वारंवार पाठपुरावा करूनही तलाठी दाद देत नसल्याने ते हतबल झाले आहेत. या प्रकरणी दिवाणी न्यायाधीशांचे अधिकार असणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या तलाठ्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सदर तलाठ्याबाबत सर्वत्र तक्रारी असल्याचे सांगितले जाते. तालुक्यात फेरफार नोंदीचा अंमल न घेणे, नियमित कार्यालयात न येणे, लोकांशी वाद घालणे, नोंदी करण्यास टाळाटाळ करणे आदि गंभीर तक्र ारी नागरिकांनी या तलाठ्याविरोधात केल्या आहेत. तक्र ारी असूनही वरिष्ठ अधिकारी कठोर भूमिका घेत नसल्याने त्यांची मजल आता आदेशांना हरताळ फासण्याकडे झाली आहे. राज्यभर तलाठी संवर्गातील अधिकारी सामूहिक रजेवर असल्याने तलाठी एस. के. धात्रक यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे कळू शकलेले नाही.( वार्ताहर)