‘समाज कल्याण’चा अखर्चित निधी वर्ग करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:19 PM2019-08-20T23:19:19+5:302019-08-21T01:05:52+5:30
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची मासिक सभा घेण्यात येऊन त्यात समाज कल्याण खात्यातील विविध योजनांसाठी तरतूद केलेल्या व अखर्चित राहिलेल्या गेल्या दोन वर्षांतील निधी येत्या आठ दिवसांत जिल्हा अपंग निधी व जिल्हा निधीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना सभापती सुनिता चारोस्कर यांनी दिल्या.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची मासिक सभा घेण्यात येऊन त्यात समाज कल्याण खात्यातील विविध योजनांसाठी तरतूद केलेल्या व अखर्चित राहिलेल्या गेल्या दोन वर्षांतील निधी येत्या आठ दिवसांत जिल्हा अपंग निधी व जिल्हा निधीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना सभापती सुनिता चारोस्कर यांनी दिल्या.
समाज कल्याण समितीची सभा सभापती सुनिता चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम. टी. वानखेडे यांनी योजनांची माहिती देत आढावा घेतला. समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या २० टक्के, ३ टक्के वृद्ध, कलावंत मानधन, आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेण्यात आला. सन २०१९-२० साठी २० टक्के जि. प. सेस मागासवर्गीय शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप तसेच मागासवर्गीय बेरोजगारांना व्यवसायासाठी चारचाकी वाहने पुरविण्याच्या योजना घेण्यात आलेल्या असून, १२८ चारचाकीचे लाभार्थी मंजूर करण्यात आलेले आहेत.
२७५ दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल योजना व दिव्यांगांना आवश्यक साधनसामग्री घेणेसाठी ८ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या बैठकीतच ८ दिव्यांग जोडप्यांना अपंग-सदृढ विवाह योजनेंतर्गत २५ हजार रोख व २४५०० रुपये किमतीचे किसान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर बैठकीस हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हु गायकवाड, ज्योती जाधव, रोहिणी गावित, शोभा कडाळे उपस्थित होते.