पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश
By admin | Published: June 23, 2014 12:25 AM2014-06-23T00:25:24+5:302014-06-24T00:25:17+5:30
सुरगाणा : तालुक्यातील पाणीटंचाईस जबाबदार ठरलेल्या संबंधित एजन्सीवर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी आढावा बैठकीत केली.
सुरगाणा : तालुक्यातील नळपाणीपुरवठा योजना अपूर्ण व रखडवून ठेवून पाणीटंचाईस जबाबदार ठरलेल्या संबंधित एजन्सीवर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी आयोजित तालुक्यातील विविध विकास -कामांच्या आढावा बैठकीत केली.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीस तहसीलदार रशिद तडवी, नितीन पवार यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या आढावा बैठकीत उपस्थित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्रस्त असलेल्या उपस्थितानी चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी केवळ कोटेशन भरले आहेत. त्यांना अद्यापही वीजजोडणी करून मिळालेली नाही. तरीदेखील त्यांना न चुकता दर महिन्याला देयके प्राप्त होत असून अनेकांनी वीजजोडणी नसताना वीजदेयके भरली असल्याने उपस्थितांनी यावेळी प्रचंड रोष व्यक्त केला. सहा तासांचे भारनियमन असताना १२ ते १३ तास भारनियमन तालुक्यात होत असल्याचे सांगण्यात आले. उंबरठाण परिसरात तब्बल ७८ गावे पाडे अंधारात असल्याचे सांगण्यात येऊन वीज खाबांची मागणी करण्यात आली. विजेचे खांब संबंधित एजन्सी स्वत: न देता तेथील ग्रामस्थांना घेऊन जाण्यास सांगत असल्याचीही तक्रार यावेळी करण्यात आली. रात्री लोक झोपल्यानंतर वीज येते. वीजपुरवठा सुरळीत असावा. वादळामुळे जमीनदोस्त झालेले विद्युत पोल त्वरित उभे केले जावेत, कर्मचारीच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, वेळेत वीजजोडणी दिले जावे, अशी मागणी आढावा बैठकीत करण्यात आली.
तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई सुरू आहे. काही गावांचे प्रस्ताव फेब्रुवारीत देऊनही वरिष्ठ स्तरावरुन पाणी टँकर वेळेत मिळण्यास दिरंगाई करण्यात आली. पाणी टँकर वेळेत तर मिळाले नाहीच पण जे टँकर आले ते अतिशय जुनाट व केव्हाही नादुरुस्त होऊ शकतात, असे टँकर दिलेत.
अपूर्ण व रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेबाबत संताप व्यक्त झाला. २००७ व ०८ मधील काही योजना अद्यापही अपूर्ण असून, ज्या काही नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण अहेत त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करा, अशी सूचना पवार यांनी दिली.
शिक्षण विभागातील रिक्त जागा भरल्या जाव्यात. वर्षानुवर्षे परागंदा झालेल्या शिक्षकांच्या जागा भरल्या जाव्यात. मिटिंगचे नाव करुन दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी, शाळांमध्ये विद्युतीकरण व्हावे मॉडेल स्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे भरावी इत्यादी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)