ग्रामपंचायत विसर्जित करण्याचे आदेश
By Admin | Published: October 1, 2015 12:00 AM2015-10-01T00:00:00+5:302015-10-01T00:01:26+5:30
नागडे येथील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ
येवला : तालुक्यातील नागडे येथील अतिक्र मण काढण्यास येवला पंचायत समितीसह नागडे ग्रामपंचायतीने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी नागडे ग्रामपंचायत विसर्जित (विघटित) करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावा, असा आदेश येवला गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे.
अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला येवला पंचायत समितीसह नागडे ग्रामपंचायतीने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याच्या निषेधार्थ सागर साळी यांनी थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. यासाठी गेल्या दोन वर्षांत तीन वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला. उपोषण अखेर यशस्वी होऊन अतिक्र मण काढण्याची कार्यवाही सुरू झाली होती. अतिक्रमण काढण्यास चालढकल केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका गटविकास अधिकारी यांनी घेतली होती; मात्र अतिक्रमणाची कार्यवाही पुन्हा लालफितीत अडकली.
अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनकर्ते सागर साळी यांनी २९ सप्टेंबरला कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. आत्मदहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी जोरदार हालचाली झाल्या. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकारी यांना स्पष्ट आदेश दिले. या आदेशात म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांनी सततचा पाठपुरावा केला. तरीही ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३मध्ये अतिक्रमण काढण्याची स्पष्ट तरतूद असताना नागडे ग्रामपंचायतीने अतिक्र मण काढण्यास टाळाटाळ केली व ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पडण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे नागडे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा परिषदेकडे पाठवावा, असा आदेश दिला आहे. (वार्ताहर)