महिनाअखेर शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:43 PM2019-11-05T19:43:56+5:302019-11-05T19:49:11+5:30
मंगळवारी स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी शहर व परिसरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रभागनिहाय असणारे खड्डे,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण व त्यातून होणारे लहान-मोठे अपघात पाहता, महापालिका टीकेची धनी होत असल्याचे पाहून महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजवून शहर खड्डेमुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंगळवारी स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी शहर व परिसरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रभागनिहाय असणारे खड्डे, बुजवण्यात आलेले खड्डे याची सविस्तर माहिती अधिका-यांकडून जाणून घेतली. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या, रस्ता दुभाजकाची स्वच्छता करण्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अधिका-याने प्रभागनिहाय पाहणी करून पुनश्च एकदा खड्डे निरीक्षण करावे व ते त्वरित बुजविण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना अधिका-यांना दिल्या. बुधवार, दि. ६ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या साईड पट्ट्या भरणे, रस्त्याच्या कडेला उगवलेले तणनाशक मारून व कर्मचा-यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात यावे. तसेच दिनांक १० नोव्हेंबर नंतर रस्त्यांचे खड्डे तातडीने बुजवून ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्यात यावे. या कर्तव्यात कसूर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर राहणार असल्याचा इशारा निमसे यांनी दिला. यापुढे पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स डांबर वापरण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच शहर व परिसरातील प्रभागांमध्ये ज्या भागातील रस्ते दहा ते बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहेत त्या परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून माहिती घेऊन अशा रस्त्यांचे अस्तरीकरणाचे नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अशा रस्त्यांसाठी नवीन अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीस नगरसेविका कल्पना पांडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, रामसिंग गांगुर्डे, सतीश हिरे आदींसह उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.