येवल्यातील बंधारे भरून देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:15 AM2018-08-26T01:15:35+5:302018-08-26T01:16:04+5:30
तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच वितरिकेवरील बंधारे सिंचनाच्या पाण्याव्यतिरिक्त भरून द्यावेत, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते बाबा डमाळे यांनी दिली.
येवला : तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच वितरिकेवरील बंधारे सिंचनाच्या पाण्याव्यतिरिक्त भरून द्यावेत, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते बाबा डमाळे यांनी दिली.
येवला तालुका व लासलगाव-विंचूर परिसरात पर्जन्यवृष्टी कमी प्रमाणात झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची वाढ झालेली नाही. त्याचप्रमाणे कमी पावसामुळे या भागातील नदी-नाल्यांवरील बंधारेही पाण्याने भरलेले नाहीत. चालू आवर्तनाबरोबर या भागातील सर्व बंधारे पाण्याने भरून दिले तर भविष्यात पिण्याच्या व शेतीच्या पाणीटंचाईवर मात करता येईल, अशी मागणी भाजपा नेते बाबा डमाळे यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे केली होती. येवला तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील नदी, नाले, बंधारे देवनदी, आयनानदी, कोळगंगा, नारंगी, अगस्ती, गोरख, वनारसी नाला, खडकी नाला, गोईनदी यांसह अन्य नदी- नाल्यांना पालखेडच्या वितरिका क्र मांक २० ते ४५ या परिसरात येतात. त्यामुळे सर्व नदी-नाल्यांना पाणी भरून देणे शक्य आहे, असे डमाळे यांनी सांगितले होते. वरील सर्व नदी-नाले दक्षिणवाहिनी असल्यामुळे सर्व बंधारे भरल्यानंतरही उर्वरित पाणी गोदावरी नदीला सामाविष्ट होईल. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही, असे डमाळे यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले.
अहवाल घेतला
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व माहिती घेत नाशिक विभागीय पाटबंधारे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांना दूरध्वनीद्वारे महाजन सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे वितरिका क्र मांक ४६ ते ५२ व नारंगी-सारंगी प्रकल्पास पाणी सोडल्याबाबतचाही अहवाल त्यांनी घेतला.