अनाथ बालकांचा तत्काळ सर्व्हे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:07+5:302021-06-11T04:11:07+5:30
महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. या सभेत एप्रिल २०२१ अखेर वार्षिक ...
महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. या सभेत एप्रिल २०२१ अखेर वार्षिक कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके २२८८ व तीव्र गंभीर कुपोषित बालके ३४९ असल्याचे सांगण्यात आले. १५ वा वित्त आयोग निधीमधून अंगणवाडी बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी १० टक्के निधी खर्च करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सदर निधीमधून कुपोषणावर सर्व ग्रामपंचायती खर्च करतात किंवा नाही, याबाबत सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आढावा घ्यावा, अशा सूचना सभापती आहेर यांनी केल्या. त्याचबरोबर कोविडमुळे पालकांचा मृत्यू झाला, अशा अनाथ बालकांचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा. शासनाने सदर अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. ग्रामीण भागात अनाथ बालकांचे तत्काळ सर्वेक्षण करून माहिती सादर करावी, तसेच कोणतेही बालक लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नाशिक जिल्ह्यात जी बालके अनाथ झालेली आहेत, अशा बालकांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आवाहन देखील सभापती यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यात २२८ अंगणवाडी सेविका ८३९ अंगणवाडी मदतनीस व ८५ मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी देखील दिलेली आहे. मात्र, कोविड संसर्गामुळे सदर भरती प्रक्रिया झालेली नाही. सद्य:स्थितीत कोविड रुग्णांचे प्रमाण कमी होत असून, अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना पोषण आहार वाटप करताना अडचणी येत असल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया माहे जून-जुलैमध्ये प्राधान्याने करण्यात यावी, अशा सूचनाही सभापती अश्विनी आहेर यांनी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. भरती प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती जिल्हा परिषद पदाधिकारी व जिल्हा परिषद यांना देण्याबाबत सूचना दिल्या. (फोटो ०७ अश्विनी)