जिल्हा रुग्णालयातील स्थिती सुधारण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:17 AM2019-12-19T00:17:38+5:302019-12-19T00:18:07+5:30
आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.
नाशिक : आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या. तुटलेले दरवाजे, जिन्यातील भिंतीचे ‘लाल’ झालेले कोपरे, खिडक्यांच्या फुटलेल्या काचांसह कक्षांमधील बेडसीटसह अन्य साधनांची दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी व्यवस्थापनाला दिले.
जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना मिळणाºया वैद्यकीय सुविधांची गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी येत्या काही दिवसांत राष्टÑीयस्तरावरील समिती शहरात लवकरच येऊन धडकणार आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. समितीच्या पाहणीत कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह रुग्णालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जगदाळे यांनीही रुग्णालयाच्या विविध विभागप्रमुखांना आवश्यक त्या सूचना बैठकीत दिल्या आहेत.
सध्या आठवडाभरापासून जिल्हा रुग्णालयाबाहेर रस्त्यालगत भुयारी गटारीचे खोदकाम सुरू असल्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकांना बसणारा ‘झटका’ तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कायमस्वरूपी दूर करावा लागणार आहे.
रावखंडे यांनी बाह्य रु ग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष, प्रसूती गृह, शल्यचिकित्सा कक्ष, पुरुष शल्य विभाग, शवविच्छेदन कक्षाला भेट दिली. आरोग्य विभागाकडून रुग्णालयातील कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे एक कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे, तरीदेखील या विभागाकडून मात्र रुग्णालयातील कामे आटोपती घेण्यास प्राधान्य दिले जात नसल्याचे चित्र आहे.
कामे तातडीने मार्गी लावावीत
अनेक विभागांत दरवाजे तुटले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. काही ठिकाणी फरशा उखडल्या आहेत. याशिवाय टाईल्सही फुटल्याचे पाहणीत आढळून आले. विविध कक्षांमधील शौचालय, प्रसाधनगृहांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे रावखंडे यांनी राष्टÑीय समितीच्या पाहणीत असे ‘चित्र’ रुग्णालयाचे दाखवायचे आहे का? असा रोखठोक सवालही भेटीदरम्यान केला. तत्काळ देखभालदुरुस्ती, स्वच्छताविषयकची सर्व ती कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.