गोदाकाठ भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश
By admin | Published: September 7, 2015 11:08 PM2015-09-07T23:08:51+5:302015-09-07T23:12:36+5:30
गोदाकाठ भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश
निफाड : अनेक महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या गोदाकाठ भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांच्या संख्येत त्वरित वाढ करावी,
असा आदेश वनवित्त व नियोजन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याच्या सचिवांना
दिले.
गोदाकाठातील भाजपाचे युवा कार्यकर्ते शरद नाठे, आदेश सानप यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन गोदाकाठ भागाची परिस्थितीची जाणीव करून दिली व निवेदन दिले. सावधानतेच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला त्वरित पिंजऱ्यांमध्ये वाढ करण्याचे आदेश दिले.
शरद नाठे व यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोदाकाठी भागातील शिंगवे, करंजगाव, सायखेडा, भुसे, चापडगाव, मांजरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा संचार आढळून आला असून, परिसरातील वस्त्यांवर राहणारे शेतकरी, मजूर, विद्यार्थी, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नाही. याचा विचार करून या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, गोदाकाठ भागात मुख्यवन संरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक व एक मुख्य कार्यालय व्हावे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना त्वरित उपचार व मृत झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत मिळावी, अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
या भागात बिबट्यांचा संचार वाढला असून, २ बालकांचा बिबट्याने जीव घेतला आहे, तर पशुधनावर प्राणघातक हल्लेही केले आहेत. गोदाकाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्यांचा नेहमी संचार असतोच. याचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात. या प्रसंगी गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत नाठे यांनी मुनगुंटीवार यांना विशद केली. मुनगंटीवार यांनी तत्काळ संबंधित विभागाला पिंजऱ्यांत वाढ करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
बिबट्याचे पुन्हा दर्शन
तालुक्यातील शिवरे येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने बाजीराव सानप यांच्या शेतात दुसऱ्यांदा पिंजरा लावला आहे. काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्यांनी पोषक परिस्थिती असलेल्या शिवरे येथे मुक्काम ठोकलेला आहे. महिन्यापूर्वी बाजीराव सानप यांच्या वालवडच्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्यानंतर त्यास पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. परंतु त्यानंतर सदर बिबट्या या भागातून गायब झाला होता. मात्र बिबट्याचा वावर शिवऱ्याच्या पट्ट्यात होता. शनिवारी या बिबट्याने पुन्हा सानप वस्तीजवळ दर्शन दिल्यानंतर शनिवारी बाजीराव सानप यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा लागला. परंतु रविवारी (दि. ६) या बिबट्याने मधुकर सानप यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना मक्याच्या शेतात सकाळी १०.३० च्या सुमारास दर्शन दिल्याने मजूरही घाबरून गेले. सोमवारी सायंकाळपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला नव्हता.