नांदूरमधमेश्वरच्या पाणवेली हटविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:39 AM2019-06-14T00:39:20+5:302019-06-14T00:39:51+5:30
नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाण्यावरील पाणवेली काढून १६ गाव पाणी योजनेच्या फिल्टर प्लॅण्टवर पाण्याचे शुद्धीकरण त्वरित करून घेण्यासंबंधी तसेच नागरिकांना पाणी वेळेवर मिळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.
लासलगाव : नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाण्यावरील पाणवेली काढून १६ गाव पाणी योजनेच्या फिल्टर प्लॅण्टवर पाण्याचे शुद्धीकरण त्वरित करून घेण्यासंबंधी तसेच नागरिकांना पाणी वेळेवर मिळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.
गुरुवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते तसेच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांंची भेट घेऊन त्यांना समस्यांबाबत माहिती दिली. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, गणप्रमुख नीलेश दरेकर, शाखाप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना शहर संघटक संकेत वाघ, सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी, बापू कुशारे, उत्तमराव खांगळ यांचा समावेश होता.
लासलगाव येथील पाणीपुरवठा विस्कळीत असून, अधिकारी सुस्त असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत, याकडे शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा समितीच्या ढिसाळ नियोजनाबाबत निवेदन दिले. धरणात पाणी असूनदेखील योजनेतील गावांना १३ दिवसांनी अशुद्ध व शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी समितीचे सचिव संदीप कराड यांना वरील सूचना केल्या. तसेच पाइपलाइन देखभाल, दुरु स्तीसाठी ११ लाख ३० हजार रु पयांची निविदा तत्काळ काढण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले.