विरगाव येथील ब्रिटिशकालीन पाटाच्या दुरुस्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 04:28 PM2020-10-27T16:28:45+5:302020-10-27T16:29:38+5:30
विरगाव : कान्हेरी नदीतून सुकड नाल्यात पाणी टाकण्यासाठी विरगाव येथील नादुरुस्त ब्रिटिशकालीन पाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे लेखी आदेश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबधित विभागाला दिले असून मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत नुकतेच लेखी आदेश प्राप्त झाले आहेत.

विरगाव येथील थळक्षेत्राला आरक्षित तसेच पुरपाण्याचा लाभ व्हावा यासाठी ब्रिटिश काळापासून स्वतंत्र पाटाची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे विरगाव या गावातील शेतीला खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. कान्हेरी नदीतुन थेट सुकड नाल्यात पाणी टाकता येईल अशी रचनाही यात समाविष्ट आहे. मात्र अनेक वर्षांपासून हा पाट बंदावस्थेत पडला असल्याने विरगाव येथील शेतीसिंचनासह सुकड नाल्यात पाणी टाकणे कामी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सदर पाणी सुकड नाल्यात टाकण्यासाठी तरसाळी, औंदाणे गावातील जनतेने लोकसहभागातून पुढाकारही घेतला होता. मात्र वारंवार अपयश येत असल्याने अखेर प्रहार संघटनेचे तुषार खैरनार यांनी याप्रश्नी बच्चू कडू यांच्याकडे कैफियत मांडली होती.
कान्हेरी नदीचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकून वनोली, तरसाळी, औंदाणे, यशवंत नगर व सटाणा परिसरातील शेतीचा प्रश्न मार्गी लावला जावा यासाठी येथील शेतकरी वर्गाने वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी सदर नादुरुस्त पाटाची लोकसहभागातून दुरुस्ती करून अनेक वेळा पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्यासाठी सदर शेतकरी वर्गाने प्रयत्नही करून पाहिला आहे. मात्र संबधित विभागाच्या बोटचेपी भूमिकेमुळे पाणी असूनही ही गावे आजही तहानलेलीच राहत आहेत. सदर पाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश आता स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.