पोलीस मुख्यालयाच्या जागेचा अहवाल देण्याचे आदेश
By admin | Published: February 10, 2017 10:55 PM2017-02-10T22:55:25+5:302017-02-10T22:55:39+5:30
उच्च न्यायालय : जिल्हा न्यायालयासाठी अडीच एकर
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाने मागणी केलेल्या पोलीस मुख्यालयातील पाच एकर जागेपैकी पोलिसांनी तयारी दाखविलेल्या अडीच एकर जागेचे सीमांकन करून त्याचा हस्तांतरण अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने सरकारला दिले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिके वर शुक्रवारी (दि़ १०) हे आदेश देण्यात आले़
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयास दिवसेंदिवस जागा अपुरी पडत असून, विस्ताराची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते आहे़ त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली़ यामध्ये महाधिवक्ता देव यांनी पोलीस मुख्यालयातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्यास तयार असल्याचे सांगितले़ त्यावर खंडपीठाने पोलीस मुख्यालयातील कोणती जागा न्यायालयासाठी हस्तांतरित करणार त्याचे सीमांकन व हस्तांतरण अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश सरकारला दिले़
जिल्हा न्यायालयासाठी पाच एकर जागा मिळावी यासाठी बांधकाम कमिटी ठाम असून, सद्यस्थितीत अडीच एकर जागा देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने दर्शविली आहे़ उर्वरित अडीच एकर जागा केव्हा मिळते याबाबत वकिलांमध्ये उत्सुकता आहे़ दरम्यान, सीमांकन व हस्तांतरण अहवाल व त्यानंतर मुख्य हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच याठिकाणी काम सुरू होणार आहे़ यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड़ सचिन गिते व संदीप शिंदे उच्च न्यायालयात उपस्थित होते़ (प्रतिनिधी)