मुख्याध्यापकाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 02:50 PM2019-07-17T14:50:50+5:302019-07-17T14:52:39+5:30
निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ओझर प्राथमिक शाळेतील तत्कालीन शिक्षिका २०१५ मध्ये १९२ दिवस वैद्यकीय कारणास्तवर रजेवर होत्या. त्यांचा रजा मंजुरीचा प्रस्ताव निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने विलंबाने २०१७ मध्ये मंजुरीस्तव सादर केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : निफाड तालुक्यातील ओझर येथील प्राथमिक शिक्षिकेच्या रजा मंजुरीचा प्रस्ताव विलंबाने मंजुरीसाठी सादर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहायकाची तसेच रजेचा कालावधी ९० दिवसांपेक्षा जास्त असतानाही संबंधित शिक्षिकेस वैद्यकीय मंडळाकडे तपासणीसाठी न पाठविता परस्पर कामावर हजर करून घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापकाची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. या प्रकरणी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ओझर प्राथमिक शाळेतील तत्कालीन शिक्षिका २०१५ मध्ये १९२ दिवस वैद्यकीय कारणास्तवर रजेवर होत्या. त्यांचा रजा मंजुरीचा प्रस्ताव निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने विलंबाने २०१७ मध्ये मंजुरीस्तव सादर केला होता. या प्रकरणी निफाड पंचायत समितीच्या कनिष्ठ सहायक हेमलता गायकवाड यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी दोषी आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाप्रमाणे त्यांची एक वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर शिक्षिकांची रजा ९० दिवसांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार वैद्यकीय मंडळाकडे त्यांना तपासणीसाठी पाठविणे आवश्यक होते. मात्र शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार यांनी त्यांना परस्पर हजर करून घेतल्याने त्यांचीही एक वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांचेही त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारणे नियंत्रण नसल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही महाराष्टÑ नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियमांचा भंग केल्याने सक्त ताकीद देण्यात आली असून, त्यांच्या मूळसेवा पुस्तकात यांची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.