आजाराने पीडित रुग्णांची सरसकट तपासणीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:44 PM2020-06-19T19:44:11+5:302020-06-19T19:45:11+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, त्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या आठ तालुक्यांत संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक यापूर्वीच करण्यात येऊन त्यांच्याकडून दैनंदिन रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, त्याचा आणखी प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे वयाच्या चाळिशीनंतर अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या सरसकट सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार तालुक्यांचा दौरा करून तशा सूचना दिल्या आहेत. आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची दर तीन दिवसांनी पुन्हा तपासणी करून त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, मनमाड येथे कोरोनामुक्त झालेल्या नऊ व्यक्तींना उपचाराअंति घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, त्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या आठ तालुक्यांत संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक यापूर्वीच करण्यात येऊन त्यांच्याकडून दैनंदिन रुग्ण व त्यांच्यावरील उपचाराची तसेच प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती घेतली जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.१९) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी निफाड, येवला, चांदवड व मनमाड येथे भेट देऊन त्यांनी कोरोनाबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. कोरोना रुग्ण सापडलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच संपूर्ण गावातीलच अन्य आजारांनी ग्रस्त असलेले म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, कॅन्सर, दमा, टीबी अस्थमा अशा रुग्णांचीही स्वयंस्फूर्तीने घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना बनसोड यांनी दिल्या. अशा रुग्णांच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भेट देऊन त्यांच्या तापाची तसेच रक्तातील आॅक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करून त्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यातील लक्षणांवर लक्ष ठेवून तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या संदर्भात प्रत्येक ठिकाणी स्थानिक अधिकाºयांची बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दौºयात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, गणेश चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मेनकर, तहसीलदार कुलकर्णी, केअर सेंटरचे प्रमुख डॉ. जगताप आदी उपस्थित होते.