विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा तपासण्याचे आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल
By श्याम बागुल | Published: August 25, 2023 04:17 PM2023-08-25T16:17:29+5:302023-08-25T16:17:54+5:30
महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत दिले जाणारे मध्यान्ह भोजन योजना नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे.
नाशिक : नाशिक महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत. तसेच स्वत: शिक्षणाधिकाऱ्यांनीच काही शाळांना भेटी देऊन चव चाखली असल्याने त्याच धर्तीवर केंद्र प्रमुखांनीदेखील बचत गटांकडून पुरविल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा चव घेऊन तपासावा व तसा अहवाल सादर करण्याचे सुचविण्यात आले आहे.
महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत दिले जाणारे मध्यान्ह भोजन योजना नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. शासनाने सेंट्रल किचनची संकल्पना गृहीत धरून महापालिका पातळीवर ठेकेदारामार्फत ही योजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र महापालिकेच्या सभेत तत्कालीन माजी नगरसेवकांनी ठेकेदारामार्फत ही योजना राबविण्याऐवजी महिला बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन पुरविले जावे, असा ठराव केला होता. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून महिला बचत गटांना तीन वर्षांसाठी ठेका दिला आहे. मात्र, ज्यांना हा ठेका मिळाला नाही अशांकडून मध्यान्ह भोजनाच्या दर्जाविषयी तक्रारी केल्या जात आहेत. त्यातच काही गोष्टी न्याय प्रविष्ट झाल्या आहेत. तर मध्यंतरी मध्यान्ह भोजनाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या ताब्यातच पोषण आहाराचा तांदळाचा साठा जप्त करण्याची कार्यवाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना करावी लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या जात असून, यात काही शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचाही समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्याकडून भोजन योजनेचा आढावा घेतला असता, त्यात भोजनाचा दर्जा राखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार केंद्र प्रमुखांच्या बैठकीत केंद्र प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये भेटी देऊन मध्यान्ह भोजनाची चव चाखण्यास सांगण्यात आले आहे.