मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:18 AM2018-06-14T01:18:49+5:302018-06-14T01:18:49+5:30
मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नाशिक : मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आगामी वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही असून, निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढलेली असताना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आयोगाचे आदेश असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाही. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाहीत. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत. यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक असताना पाठपुरावा करूनही अनेक मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट झालेली नसल्याने असे नागरिक त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीतही नाशिक जिल्ह्यात या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात ३४ लाख १५ हजार ५८० मतदार असून, मोहीम मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी ४ लाख २ हजार १४४ मतदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. मोहीम सुरू झाल्यानंतर ११ लाख २१ हजार ६५८ मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ जूनपर्यंत ५ लाख ३६ हजार ९८५ मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, एकूण मतदार संख्येच्या ४७.८७ टक्केच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदारांची माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही मतदार यादीत नावाचा समावेश व माहितीची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे.