५० वराहांचे रक्तजल नमुने घेण्याचे दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:15 AM2018-05-24T00:15:56+5:302018-05-24T00:15:56+5:30
केरळमध्ये पसरलेल्या ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रादेशिक पशुसंवर्धन व आयुक्त कार्यालयापासून तर सर्व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांना जिल्हानिहाय ५० डुकरांचे रक्तजल नमुने सर्वेक्षणासाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : केरळमध्ये पसरलेल्या ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रादेशिक पशुसंवर्धन व आयुक्त कार्यालयापासून तर सर्व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांना जिल्हानिहाय ५० डुकरांचे रक्तजल नमुने सर्वेक्षणासाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. केरळमध्ये पसरलेल्या निपाह या झुनोटिक विषाणूजन्य रोगाचा संसर्ग माणसांमध्ये दिसून आला आहे. या रोगाचा प्रसार वटवाघळांची विष्ठा, लाळ व मूत्राद्वारे डुकरांना होत असल्याचे राज्याचे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी सूचनापत्रकात स्पष्ट केले आहे. जागतिक पशू आरोग्य संस्थेच्या (वर्ल्ड आॅर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ) यादीत हा रोग नमूद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाधित डुकराच्या संपकर् ात आल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन चिकित्सालय यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत. गाव, शहरांमध्ये बाधित डुकरे आढळल्यास त्वरित त्याची उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत देण्यात आली आहे. या उपाययोजना करण्यापूर्वी संशयित बाधित डुकरांच्या संपर्कात येताना संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे. गाव व शहराच्या पातळीवर डुकरांमध्ये निपाह रोगाची लक्षणे दिसून आल्यास अथवा निपाहसदृश आजारामुळे मृत्युमुखी पडल्यास त्वरित पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मृत डुकरांचे स्थानिक शवविच्छेदन टाळा
मृत्युमुखी पडलेल्या डुकरांचे शहर व ग्राम पातळीवर शवविच्छेदन करणे पूर्णपणे टाळावे. मृत्युमुखी डुकरे आढळल्यास रोग अन्वेषण विभागाला त्याची माहिती द्यावी. जेणेकरून योग्य मार्गदर्शक तत्त्वे व खबरदारीच्या सूचनांद्वारे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच संशयित निपाहबाधित अथवा निपाहसदृश डुकरांच्या संपकर् ात येण्यापूर्वी पीपीई कीटसह एन-९५ मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय सतर्क
शहरातील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे. त्यानुसार शहर व परिसरातील डुकरांवर विशेष लक्ष राहणार असून, तसेच कोठे डुकरे मृत्युमुखी व रोगट स्वरुपात आढळल्यास त्वरित अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.