अवयवदान एक चळवळ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:01+5:302021-05-20T04:15:01+5:30

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी ...

Organ donation should be a movement! | अवयवदान एक चळवळ व्हावी !

अवयवदान एक चळवळ व्हावी !

Next

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी मांडली.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत विसावे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘अवयवदान महापुण्य’ या विषयावर ते बोलत होते. अवयवदानाविषयी समाजात मोठे गैरसमज आहेत, आपल्या मृत्यूनंतर या अवयवांच्या माध्यमातून आपण कुणाला जीवदान देऊ शकतो, ही भावना महत्त्वाची आहे.आपल्या देशात एक लाख लोकांनी मूत्रपिंड हवे आहे, म्हणून नावनोंदणी केली. नाशिकमध्ये ४ ते ५ हजार लोक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत; पण किडनीसाठी नोंदणी फक्त ३०० जणांनी केली, कारण नोंदणी करावी लागते यासंदर्भात लोक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती डॉ. रकिबे यांनी दिली.

जिवंत व्यक्तीही अवयवदान करू शकतो, किडनी, यकृताचा काही भाग, कॅन्सर रुग्णांसाठी बोनमॅरो या अवयवांचे दान जिवंत व्यक्ती करू शकतो, तर मेंदूमृत व्यक्ती ३६ लोकांना जीवन देऊ शकतो असेही डॉ. रकिबे यांनी स्पष्ट केले. डॉक्टर्स अवयव विक्री करतात,असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. त्याचप्रमाणे काही धर्मांमध्येही अवयवदानाविषयी जागृती नाही. यावरही डॉ. रकिबे यांनी बोट ठेवले. कुठलाच धर्म दानाला नाही म्हणत नाही, म्हणून अवयवदान करायला हवे. उत्तर महाराष्ट्राची गरज नऊ हजार डोळ्यांसाठीची आहे; पण वर्षात केवळ शंभर डोळे मिळतात. भारतात नेत्रदान झाले तर संपूर्ण जगाला आपण डोळे पुरवू शकू, असेही डॉ. रकिबे यांनी सांगितले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदान प्रक्रियेला काहीशी गती प्राप्त झाली आहे. जीवन अनमोल असून, समाजऋण फेडण्यासाठी अवयवदान करण्याची मानसिकता तयार करा, असे भावनिक आवाहन डॉ. रकिबे यांनी केले.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ता : गौतम संचेती

विषय : प्रसिद्धी माध्यमांपुढील नवनवीन आव्हाने

Web Title: Organ donation should be a movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.