नाशिक पोलिसांच्या ‘बाल-बिरादरी’मुळे गुन्हेगारीतील २५० मुले समाजाच्या मूळ प्रवाहात
By विजय मोरे | Published: December 26, 2018 08:21 PM2018-12-26T20:21:18+5:302018-12-26T20:35:57+5:30
नाशिक : वास्तव्याचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती अन् घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होत असतो़ शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात़ या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका हे चोरी-छुपे तर कधी उघडपणे सुरू असते़ त्यामुळे साहजिकच या वातावरणात वाढणारी मुले ही उमलत्या वयातच गुन्हेगारीकडे खेचली जातात़ या मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी काही महिन्यांपूर्वी समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘बाल-बिरादरी’ या प्रकल्पामुळे फुलेनगरमधील सुमारे २५० मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे़

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलीस ठाणे अंतर्गत असलेले फुलेनगर व सरकारवाडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेली मल्हारखाण झोपडपट्टी हे दोन्ही भाग गुन्हेगारी घटनांमुळे नेहमीच प्रकाशझोतात असतात. सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य, तथाकथित भार्इंचे उगमस्थान असलेल्या या परिसरातील वातावरण हे गुन्हेगारीस पोषक आहे़ या परिसरातील मुले अवैध मद्यविक्री वा यासारख्या लहान लहान कामांमधून गुन्हेगारीकडे वळतात़ या कामांनंतर ही मुले मोठ्या गुन्ह्यांकडे वळतात व पुढे गुन्हेगार होतात़ त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील मुलांना लहान वयातच चांगले संस्कार, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावण्यासाठी छोट्या उद्योगाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी आयुक्त सिंगल यांनी बाल-बिरादरी हा प्रकल्प सुरू केला़
पोलीस आयुक्तांनी शहरातील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू केलेला बाल-बिरादरी प्रकल्प सर्वप्रथम गुन्हेगारांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या फुलेनगर झोपडपट्टीत राबविण्यात आला़ या परिसरातील लहान वयोगटातील मुले मद्यविक्री करीत असल्याचे चित्र होते़ पोलीस आयुक्तालयातील कल्याण विभाग, सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुमारे सहा महिने हा प्रकल्प राबविण्यात आला़ गुन्हेगारीकडे वळलेली वा वळू पाहणारी सुमारे २५० मुले या उपक्रमात सहभागी झाली़ या परिसरातील मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहण्यासाठी समुपदेशन करणे, घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावता यावा यासाठी ज्वेलरी मेकिंग तसेच इतर उद्योगांबाबत प्रशिक्षण देण्यात आले़
बाल-बिरादरी या प्रकल्पात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे एक स्रेहसंमेलनही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयोजित केले होते़ त्यामध्ये या मुलांनी रॅम्पवॉक, नाटके यांसह त्यांना शिकविण्यात आलेले विविध उपक्रम व त्यांच्यातील विविध सुप्त प्रतिभांचे सादरीकरण केले होते़ या उपक्रमात सहभागी मुलांना आयुष्याचे मोल तसेच व्यसन, गुन्हेगारी यामुळे होणारे नुकसान कळाले आहे़ सामान्य कुटुंबातील मुलांप्रमाणेच आपणही आपले आयुष्य जगणार असा संकल्प या मुलांनी केला असून, त्यानुसार आचरण सुरू केले आहे़
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रकल्प राबविला जाणार
गुन्हेगारीचे वातावरण असलेल्या शहरातील झोपडपट्ट्या हेरून या ठिकाणच्या गुन्हेगारीकडे वळणा-या मुलांचा बाल-बिरादरी प्रकल्पात समावेश करणे़ या प्रकल्पातून या मुलांना शिक्षणासाठी मदत, व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशन, छोट्या-छोट्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात आणले जाणार आहे़ सर्वप्रथम फुलेनगरमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत मल्हारखाण झोपडपट्टीत सुरू आहे़ स्वयंसेवी संस्था व पोलीस वेल्फेअरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला ‘बाल-बिरादरी’ हा प्रकल्प संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राबविला जाणार आहे़
- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक