बिजू पटनायकांचे कार्य प्रेरणादायी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक : ‘दी टॉल मॅन बिजू पटनायक’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:44 AM2018-02-04T00:44:53+5:302018-02-04T00:45:40+5:30
मुंबई : बिजू पटनायक यांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, ती त्यांनी झटून पूर्ण केली. त्यांचे कार्य आजच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे.
मुंबई : बिजू पटनायक यांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, ती त्यांनी झटून पूर्ण केली. त्यांचे कार्य आजच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी येथे केले. ओरिसाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्यावरील ‘दी टॉल मॅन - बिजू पटनायक’ या सचित्र चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन नवीन पटनाईक आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या समारंभात एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक, ओरिसा स्कील डेव्हलपमेंट अथोरिटीचे चेअरपर्सन सुब्रतो बागची आणि पुस्तकाचे लेखक सुंदर गणेसन उपस्थित होते. नवीन पटनायक म्हणाले की, हे पुस्तक प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायक आहे. या पुस्तकातून ओरिसातील एका महान नेत्याची महानता दाखवली आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेत देशाला नवी नेतृत्व मिळतील. देशाला अशा तरुणांची आवश्यकता आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी बिजू पटनायकांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, पटनायकांना संगीताची आवड आणि जाण होती. त्यांच्यासारखा संगीतप्रेमी लाभणे विरळच. संगीत, कला आणि कलाकारांचा त्यांना प्रचंड आदर होता. तो त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून नेहमीच प्रकट झाला. ते कर्तृत्वाने ‘टॉल मॅन’ होते, त्यामुळे त्यांचा सर्वांना आदर वाटतो. या पुस्तकातील प्रत्येक पान वाचकांना नवी कथा सांगेल आणि प्रेरणा देईल, असे लेखक सुंदर गणेसन यांनी सांगितले. रमाकांत पांडा म्हणाले, बिजू पटनायक हे पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरतील. मी स्वत: त्यांच्याकडून प्रेरणा घेत इथपर्यंत पोहोचलो आहे. बिजू पटनायक फक्त शारीरिक उंचीने नव्हे, तर कर्तृत्वाने उंच होते, त्यामुळेच या पुस्तकाचे नाव ‘दी टॉल मॅन - बिजू पटनायक’ असे ठेवले आहे.