दागिने आले नवे, तरी ट्रॅडिशनलच हवे!

By Admin | Published: July 3, 2014 10:26 PM2014-07-03T22:26:18+5:302014-07-04T00:12:32+5:30

दागिने आले नवे, तरी ट्रॅडिशनलच हवे!

Ornaments should be new, it is a trendy thing! | दागिने आले नवे, तरी ट्रॅडिशनलच हवे!

दागिने आले नवे, तरी ट्रॅडिशनलच हवे!

googlenewsNext

 

 

सारिका पूरकर- गुजराथी
 
नाशिक, दि. १० - दागिन्यांच्या दुनियेत रोज नवनवीन डिझाइन्सची भर पडते आहे. शुद्ध सोन्याची, कमी वजनाची असो की बेन्टेक्स, कुंदन, इमिटेशन, अमेरिकन डायमंड ज्वेलरी असो, चोखंदळ महिलांसाठी एकापेक्षा एक हटके डिझाइन्स नामांकित ज्वेलर्स आपल्या दालनात उपलब्ध करून देण्यासाठी धडपडत आहेत. तथापि, पारंपरिक दागिने, पारंपरिक डिझाइन्सची मागणी यत्किंचितही कमी झाली नसून, उलट ती दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ लग्नसमारंभांतच नव्हे, तर अन्य सणांनाही पेहराव कोणताही असो, ज्वेलरी मात्र ट्रॅडिशनलच हवी, असा आग्रह महिला आणि युवती धरताना दिसताहेत. म्हणूनच दागिन्यांची पारंपरिक घडणावळ कायम ठेवून, त्यातही आधुनिक ‘टच’ देऊन याच दागिन्यांना नवीन रूपातही सादर केले जाऊ लागले आहे.पारंपरिक हारांना चांगली मागणी
अंगभर दागिने ल्यायले की, साजशृंगाराला वेगळाच रंग चढतो. साडीवर कुठला दागिना जास्त शोभून दिसतो? तो म्हणजे नेकलेस! तो असेल तर गळा भरलेला दिसतो. पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये याचसाठी ठुशी, मोहनमाळ, चपलाहार, बकुळहार, राणीहार, लक्ष्मीहार, पोहेहार, लिंबोटी माळ, एकदाणी, कोल्हापुरी साज, पुतली माळ असे प्रकार प्रचलित होते. आजी, आई यांच्या जुन्या फोटोंमध्ये त्यांनी अंगावर नेहमी हेच दागिने घातलेले दिसतात. पूर्वापार हारांच्या याच डिझाइन्स आजही तितक्याच लोकप्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रकारच्या हारांना प्रचंड मागणी आजही आहे. शुद्ध सोन्याचे दागिने परवडत नाही, म्हणून याच डिझाइन्स कमी वजनाच्या दागिन्यांमध्येही, बेन्टेक्समध्ये उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यातही या डिझाइन्स हिट आहेत.

बांगड्या, अंगठ्या हव्यात ट्रॅडिशनल
मेटल, कुंदन, पोलकीच्या बांगड्यांच्या जमान्यात महाराष्ट्रीय पारंपरिक डिझाइन्सच्या बांगड्या महिलावर्गात अजूनही कमालीच्या लोकप्रिय आहेत. यात विशेषत: पाटल्या, गोठ, सीता पाटली, शिंदेशाही तोडे, गहू तोडे, जव तोडे या बांगड्यांच्या डिझाइन्स शाही आणि पारंपरिक लूकसाठी आजही हव्याहव्याशा आहेत. फोर्मिंग दागिन्यांच्या विश्वातही या डिझाइन्स सध्या भाव खाऊन आहेत. पूर्वीचे सर्वच दागिने ठसठशीत दिसतील असेच आहेत. त्यात अंगठीला अपवाद नाही. नाजूक अंगठीच्या डिझाइनऐवजी संपूर्ण बोटभर पानाफुलांचे डिझाइन असलेली अंगठी नव्याने लोकप्रिय झाली आहे.

मंगळसूत्रातही ‘मऱ्हाटमोळेपण’
मंगळसूत्र हा स्त्रीचा सर्वांत महत्त्वाचा दागिना मानला जातो. कारण पतीने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताक्षणीच ते दोघे प्रेमाच्या, विश्वासाच्या अतूट बंधनात बांधले जातात. हेच मंगळसूत्र नोकरदार महिलांसाठी सध्या नवनवीन डिझाइन्समुळे ‘फॅशन सिम्बॉल’ बनले आहे; मात्र तरीही मंगळसूत्राचे पारंपरिक प्रकार, डिझाइन्सही पुन्हा एकदा नव्याने महिलांना भुरळ घालत आहेत. त्यात प्रामुख्याने कोल्हापुरी डोरले आणि मणी मंगळसूत्र हे दोन प्रकार सध्या ‘इन’ आहेत. डोरले आणि गळसरी किंवा मणी मंगळसूत्र हे गळ्याशी असणारे छोटे दागिने विशेषत: खेड्यातील महिलांच्या अंगावर दिसतात. आता मात्र हे मंगळसूत्र ‘गावठी’ राहिले नसून, चांगलेच लोकप्रिय झाले आहे. इमिटेशन ज्वेलरीत तर या प्रकारांना खूप मागणी वाढल्यामुळे हे मंगळसूत्र ओवून देणारे जंगम कारागीरही ‘बिझी’ झाले आहेत.
मोत्याच्या दागिन्यांचीही क्रेझ
सोन्याचे कितीही दागिने घातले, तरी मोत्यांचे दागिने घातले की, एकदम रूपच बदलून जाते. पेशवाई लूक हवा असेल तर मोत्यांच्या दागिन्यांना आजही पर्याय नाही. म्हणूनच मोत्याची चिंचपेटी, तन्मणी, कंठा, राणीहार, बाजूबंद, झुमके, कुड्या, नथ, कानाचे वेल, मोत्याच्या बांगड्या, पेशवाई हार हे सर्व दागिने आज सर्वांनाच मोहून टाकत आहेत. रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ या मराठी मालिकेने मोत्यांच्या दागिन्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली. या मालिकेत पारंपरिक ब्राह्मणी मोत्याचे दागिने दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील पारंपरिक दागिनेही अनेक शोरूम्समध्ये नंतर उपलब्ध झाले.

अंबाडा पिन आणि बरेच काही...
पूर्वी स्त्रिया केसांचा खोपा, अंबाडा घातला की, त्यावर सोन्याचे फूल खोवत असत. तसेच मोत्याची वेणी, अंबाड्यासाठी सोन्याचेच छान डिझाइन असलेले आकडे खोचून केशरचना सुशोभित करत असत. आता दररोज अंबाडा किंवा खोपा घातला जात नाही; परंतु लग्नसमारंभात या केशरचनेबरोबरच इतर केशरचनांसाठीही हे पारंपरिक दागिने आवर्जून केसांवर माळले जातात. केसांप्रमाणेच कानाचे आभूषणही वैविध्यपूर्ण असायचे. बुगडी, पूर्ण कानभर किंवा अर्धा कानभर डिझाइन असलेली कर्णफुले, द्राक्षाच्या घोसाच्या कुड्या, मोत्याचे झुबके (झुमके), मोत्याचे वेल या कर्णफुलांच्या डिझाइन्सही आवर्जून खरेदी केल्या जातात. मालिकांचा मोठा प्रभाव
पारंपरिक दागिन्यांना सध्या प्रचंड मागणी आहे. त्यासाठी आम्हाला मराठी मालिकांना खूप धन्यवाद द्यावे लागतील. मराठी मालिकांमधून योग्य पद्धतीने इतिहास मांडला जातोय. त्यामुळेच आपली संस्कृती, तेव्हाचे राहणीमान नवीन पिढीपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचते आहे. चांगल्या गोष्टीचे अनुकरण होतेच. म्हणूनच पारंपरिक दागिन्यांची लोकप्रियता वाढविण्यात मालिकांचा खूप मोठा वाटा आहे. सध्या टेम्पल ज्वेलरी, क्लासिक ज्वेलरी खूप लोकप्रिय आहे. महिलांना याच डिझाइन्स हव्या असतात. त्यातही पोहेहार, चंद्रहार तर आजची पिढीही हौशीने मिरवते आहे. याच पारंपरिक दागिन्यांना फ्यूजन रूपातही आम्ही सादर करू लागलो आहोत.
- राजेंद्र ओढेकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

डिझाइन्स खास तयार करून घेतो...
मंगळसूत्रापासून तर नेकलेसपर्यंत सर्वच दागिन्यांमध्ये पारंपरिक डिझाइन हवे, म्हणून महिला आग्रही झाल्यामुळे आम्ही इमिटेशन ज्वेलरीत या डिझाइन्स उपलब्ध करून देऊ लागलो आहोत. थोडा ‘मॉॅडर्न टच’ देऊन हेच दागिने आम्ही तयार करीत आहोत. त्यासाठी खास कारागीर ठेवले आहेत. पारंपरिक ठुशी, मोहनमाळ, तन्मणी, चिंचपेटी, डोरले या डिझाइन्सचा अभ्यास करून मगच त्यात बदल केले जातात. आम्ही त्यास ‘आर्ट ज्वेलरी’ म्हणतो. लग्नसराई, गौरी-गणपती, दिवाळी या दिवसांत या दागिन्यांना तर मागणी असतेच; परंतु आता दैनंदिन वापरासाठीदेखील हे दागिने हमखास घातले जात आहेत.
- अतुल ठक्कर, संचालक, अनुराधा आर्ट ज्वेलरी, नाशिक

Web Title: Ornaments should be new, it is a trendy thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.