अनाथालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By Admin | Published: September 15, 2016 12:06 AM2016-09-15T00:06:29+5:302016-09-15T00:17:40+5:30
अनाथालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
त्र्यंबकेश्वर : तुपादेवी फाट्यावरील ओम त्र्यंबकराज अनाथ बालगृहातील विद्यार्थी दत्तात्रय बाळासाहेब विगे (९ वर्षे) हा बुधवारी दुपारच्या सुटीत अंघोळीसाठी प्रयागतीर्थावर गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
त्र्यंबकपासून ३ कि.मी. अंतरावरील अनाथाश्रमातील सुमारे १७ मुले त्र्यंबकेश्वरच्या जि. प. शाळेत शिक्षणासाठी येत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत शाळेतच बालकल्याण विभागामार्फत जेवण असते. तथापि, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थापासून २ कि.मी. अंतरावर ओम वाहेगुरू या नावाचा गुरुद्वारा असून, तेथे अनाथाश्रमातील विद्यार्थी दुपारच्या सुटीत जेवणासाठी रोज लंगरमध्ये जातात. दत्तात्रय मित्रांसमवेत जेवण झाल्यावर अंघोळीसाठी गेल्याचे सांगितले जाते. त्याला जेव्हा बुडताना कपडे धुणाऱ्या महिलांनी पाहिले, तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथील विक्रम कोठुळे नामक युवकाने १०८ नंबरला फोन केला. तथापि ही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे विक्रम याने आपल्या दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी वासनिक यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यासंदर्भात त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात जि. प. सदस्य संपतराव सकाळे यांनी भेट देऊन कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, याबाबत सखोल चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे म्हणाले, आज तब्बल १६ विद्यार्थी दुपारनंतर गैरहजर असल्याचे दिसून आले. हे हजेरीपुस्तक संशयास्पद असल्याने याबाबत पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे सांगितले.
त्यांच्या समवेत पती फकिरराव अहिरराव व दोघे मुले उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, हवालदार संजय खैरनार, हवा. रमेश पाटील, जाधव, काकड आदिंनी इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठविला. या मयत मुलाला फक्त आजी असून, अद्यापपावेतो ती नांदगाव येथून आलेली नव्हती. (वार्ताहर)